करवे कार्यकर्त्यांकडून कृत्य; मराठी भाषिकांकडून आज बंदची हाक
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या निषेधार्थ व्हॅक्सिन डेपो मैदानावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित महामेळाव्यासाठी उभारण्यात आलेला मंच दडपशाही करून काढून टाकण्याचा मनपा अधिकारी व पोलिसांच्या प्रयत्नाला तीव्र विरोध करून समितीने त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज सकाळी मंचावरच ठिय्या आंदोलन छेडले. मात्र यावेळी पोलिसांसमक्ष करवे कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला करून समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अंगावर शाई टाकून तोंडाला काळे फासण्याचा संतापजनक प्रकार झाल्याने सध्या व्हॅक्सिन डेपो मैदानावरील वातावरण तापले आहे.
समिती कार्यकर्त्यांनी झाल्या प्रकारचा तीव्र निषेध करून जोरदार घोषणाबाजी करून सरकार व प्रशासनाचा धिक्कार केला. मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे प्रारंभ होत आहे. मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी अधिवेशन भरविले जात असून याला आपला विरोध दर्शवण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी कंबर कसलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने काम मध्यरात्री 1:30 वाजताच मेळाव्यासाठी मंच उभारला आहे. आज सकाळी मनपा अधिकार्यांनी मैदान महापालिकेच्या मालकीची असल्यामुळे परवानगीशिवाय या ठिकाणी मंच उभारता येणार नाही असे सांगून तो हटविण्याचा प्रयत्न केला मात्र समितीच्या नेतेमंडळींनी त्याला तीव्र विरोध केला. माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी प्रथम व्हॅक्सिन डेपो मैदान महापालिकेच्या मालकीचे आहे त्याची कागदपत्रे दाखवा मग आम्ही मंच हटवायचा की नाही ते ठरवू असे अधिकार्यांना ठणकावून सांगितले. यावेळी व्यासपीठावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्यासह अन्य नेते आणि कार्यकर्ते मंचाच्या ठिकाणी उपस्थित होते. मनपा अधिकार्यांनी पोलिसांच्या मदतीने मनचा हटवण्याच्या हालचाली सुरू करताच नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी मंचावर ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी मनपा अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर आणि समिती नेतेमंडळीमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाली. समितीच्या कांही कार्यकर्त्यांनी प्रथम गेल्या जवळपास वर्षभरापासून महापालिकेसमोर बेकायदा फडकणारा लाल-पिवळा झेंडा काढा मग आम्हाला मंच हटवण्यास सांगा, असे निप्पाणीकर यांना सुनावले. यापद्धतीने लोकशाहीची पायमल्ली करून दडपशाहीने महामेळावा उधळून लावण्यासाठी मंच हटवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्या ठिकाणी चोरट्याप्रमाणे आलेल्या कांही करवे कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकून त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. महामेळाव्याचा मंच हटवण्याचा प्रयत्न होत असतानाच पोलिसांसमक्ष हा प्रकार घडल्यामुळे उपस्थित समिती कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त कार्यकर्त्यांनी दळवी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि वातावरण तापले. तथापि समिती नेत्यांनी महामेळावा उधळण्याचा हा डाव असल्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम पाळून मेळावा यशस्वी करावा असे आवाहन केले. शेकडोंच्या संख्येने व्हॅक्सिन डेपो मैदान येथे पोलिस बंदोबस्त ठेवला असताना करवे कार्यकर्त्यांकडून भ्याड कृत्य झाल्यामुळे नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचा धिक्कार केला जात आहे. म. ए. समितीकडून तक्रार दाखल करवे कार्यकर्त्यांकडून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेला भ्याड हल्ला आणि काळे फासण्याच्या निंद्य प्रकारा विरोधात म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली आज दुपारी भव्य मूक मोर्चा काढून पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आयोजित महामेळाव्याप्रसंगी दीपक दळवी यांना काळे फासण्याची संतापजनक घटना घडली. या घटनेच्या विरोधात आज दुपारी पोलिसात रितसर तक्रार नोंदविण्यात आली. यासाठी समितीच्या नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली व्हॅक्सिन मैदानापासून टिळकवाडी पोलीस ठाण्यापर्यंत भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस कोणती कारवाई करतात? हे पाहण्यासाठी मोर्चातील कार्यकर्ते तेथेच ठाण मांडून उभे होते. त्यावेळी समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी तक्रार दाखल करून घेऊन पुढील कायदेशीर कारवाई होण्यास वेळ लागणार असल्यामुळे सर्वांनी शांततेत आपापल्या घरी जावे अशी विनंती केली. त्याचप्रमाणे अध्यक्ष दीपक दळवी यांनी देखील सर्वांना शांततेत घरी किंवा आपापल्या कामधंद्यात जाण्याची विनंती केली.
याप्रसंगी मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, मदन बामणे, अॅड. राजाभाऊ पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, सरस्वती पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, शिवानी पाटील, आदी नेते मंडळींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
महामेळाव्यात ठराव
कर्नाटक सरकारच्या पाठिंब्यावर कांही कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड कृत्याची महाराष्ट्र सरकारने योग्य दखल घेऊन कर्नाटक सरकारला योग्य समज द्यावी. तसेच केंद्र सरकारच्याही निदर्शनास ही बाब आणून देण्याबरोबरच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी आपला मराठी बाणा दाखवून आपण सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी आहोत हे दाखवून द्यावे, या ठरावासह एकूण चार ठराव आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आयोजित महामेळाव्यात एकमताने मंजूर करण्यात आले. बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित मराठी भाषिकांचा महामेळावा आज शहरातील व्हॅक्सिन डेपो मैदानावर पार पडला.
आज संपूर्ण सीमाभाग बंद
कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला पूर्णपणे विरोध करुन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांना काळे फासण्याचा प्रकार आज घडला. या विरोधात संपूर्ण बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व घटकांनी मंगळवार दि. 14 रोजी बेळगाव शहरात संपूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
———————————————————————
आज खानापूर बंदची हाक
खानापूर (प्रतिनिधी) : सोमवारी बेळगांव येथे महामेळाव्याच्या दरम्यान कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर काळी शाई फेकून भ्याड हल्ला केला. या घटनेचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निषेध नोंदविला असून मंगळवारी दि. 14 रोजी खानापूर बंदची हाक दिली आहे, असे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व माजी आमदार दिगंबर पाटील, कार्यादक्ष यशवंत बिर्जे, सचिव आबासाहेब दळवी यांनी बंद पाळण्याचे आवाहन केले आहे.