बेळगाव (प्रतिनिधी): कर्नाटक राज्यात पन्नास लाखाहून अधिक संख्येने मराठा समाज आहे. परंतु या समाजाचा आत्तापर्यंत केवळ राजकीय स्वार्थापोटी उपयोग करून घेतला गेला आहे. मराठा समाजाला आरक्षणही नाही. त्यामुळेही विद्यार्थी आणि युवकांचे मोठे नुकसान होत आहे. विधानसभा आणि विधान परिषदेत सहा आमदार असतानाही एकालाही मंत्रीपद देण्यात आलेले नाही. या अन्यायाविरोधात बुधवार दि. 15 रोजी सकाळी दहा वाजता सुवर्ण विधानसौध समोर उत्तर कर्नाटकातील मराठा समाज आंदोलन करणार असल्याची माहिती, कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी दिली आहे.
या आंदोलनासंदर्भात पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बसवकल्याण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा विकास महामंडळाची घोषणा केली होती. याला आता अनेक दिवस उलटले आहेत. मात्र या महामंडळाच्या कार्यकारिणीची निवड अथवा कोणताही निधी जाहीर करण्यात आलेला नाही. मराठा विकास महामंडळ केवळ मते मिळवण्याचा एक प्रयत्न होता, अशी टीकाही गायकवाड यांनी केली.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या कार्यकाळात आमदार श्रीमंत पाटील यांना मंत्रीपद देण्यात आले. परंतु नव्या मंत्रिमंडळात यांना स्थान देण्यात आलेले नाही. हा मराठा समाजाचा अपमान आहे. पाच आमदार व एक विधान परिषद सदस्य मराठा समाजाचे असताना एकाला ही मंत्रीपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्नाटक राज्यात मराठा समाजावर होणार्या अन्यायाविरोधात सरकारला जाग आणण्यासाठी सुवर्ण विधानसौध समोर आंदोलन छेडण्यात येणार आहे.
या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यासह शेजारील बागलकोट, विजापूर, हुबळी-धारवाड, गदग, कारवार येथील दहा हजारांहून अधिक मराठा समाजाचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होतील असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
