बेळगाव : महाराष्ट्रात ओमिक्रोन रुग्ण वाढू लागल्याची धास्ती कर्नाटक सरकारने घेतली आहे. त्याचबरोबर काल गुरुवारी बेळगावात ओमिक्रोन रुग्ण आढळला आहे. कोरोना संक्रमण आणि ओमिक्रोन धास्तीने 19 डिसेंबरला होणाऱ्या सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीची पोर्णिमा यात्रेसह बेळगाव जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव, महोत्सव, धार्मिक विधी, आदीं कार्यक्रमांवर शासनाने निर्बंध लादले आहेत. शनिवार दिनांक 19 डिसेंबरला होणारी सौंदत्ती रेणुका देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोना आणि ओमिक्रोन पार्श्वभूमीवर सौंदत्ती रेणुका देवी दर्शनाला येणाऱ्या भाविकांची डोंगराकडे येणाऱ्या चारही मार्गांवर असलेल्या चेक पोस्टवर तपासणी केली जाणार आहे. भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाने वैद्यकीय पथक तैनात केले आहेत. आरोग्य विभागाच्या मदतीला पोलिसांचा फौजफाटाही देण्यात आला आहे. निपाणी जवळील राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्यावर, सौंदत्ती डोंगराकडे येणाऱ्या भाविकांसाठी माहिती फलक लावण्यात आला आहे.
डिसेंबर महिन्यातील पोर्णिमेला होणाऱ्या सौंदती येथील श्री रेणुका देवीच्या यात्रेला महाराष्ट्रातील रेणुका भक्तांची सर्वाधिक उपस्थिती असते. डिसेंबर महिन्यातील पोर्णीमा यात्रेला प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील किमान तीन ते चार लाख भाविक सौंदतीला दाखल होत असतात. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरातील रेणुका भक्तांची संख्या मोठी असते. कर्नाटक शासनाने ओमिक्रोन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहेत. याचवेळी महाराष्ट्रातही ओमिक्रोन रुग्णांची संख्या वाढत आहे. बेळगावात ओमिक्रोन रुग्ण आढळून आला आहे. याची गंभीर दखल कर्नाटक शासनाने घेतली आहे.
मंदिरात पुजारी आणि देवस्थान समितीच्या मोजक्या सदस्यांसह धार्मिक विधी करण्यात यावेत अशी सूचना जिल्हाधिकार्यांनी केली आहे. त्यामुळे 19 डिसेंबर रोजी सौंदत्ती डोंगरावर होणारा मंगळसूत्र कंकण विसर्जनचा विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
कोरोना संसर्गाचा धोका ओळखून, पोर्णिमेला सौंदतीकडे येणाऱ्या भाविकांना चार नाक्यांवर पोलिसांना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, आरटीसीपीआर नकारात्मक अहवाल कागदपत्रे सादर करावी लागत आहेत. मंदिर अथवा डोंगरावर कोणत्याही धार्मिक विधीला परवानगी देण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासनाने लागलेल्या निर्बंधांमुळे यावर्षीच्या मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी दर्शनासाठी भाविकांची संख्या रोडावली आहे. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत श्री रेणुका देवी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने विशेष काळजी घेतली जात आहे. मंदिराचे विशेष कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती जातीने प्रत्येक व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.