बेळगावात कामगारांसाठी नव्या वैद्यकीय सेवेचा शुभारंभ
बेळगाव (वार्ता) : कामगारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वेगवेगळे रोग वाढत असताना शारीरिक दृष्ट्या सक्षम राहणे अत्यावश्यक आहे. कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत सरकारने नवनव्या योजना आणि सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या योजनांचा आणि सेवांचा लाभ कामगारांनी घ्यावा. पुढील काळात कामगारांना थेट त्यांच्या दरवाजातच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आम. अभय पाटील यांनी दिली आहे.
सरकारच्यावतीने राज्यातील 3 जिल्ह्यात कामगारांसाठी फिरत्या वैद्यकीय सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या नव्या वैद्यकीय सेवेचा बेळगावात आज सोमवारी सकाळी शुभारंभ करण्यात आला. शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथे वैद्यकीय सेवा वाहनाला आम. अभय पाटील यांनी झेंडा दाखवला. यावेळी उपस्थित डेप्युटी लेबर कमिशनर वेंकटेश सिंपीहट्टी यांनी आम.अभय पाटील यांना वाहनातील वैद्यकीय उपचार संदर्भात माहिती दिली. 35 लाख रुपये खर्चाच्या या फिरत्या वैद्यकीय उपचार व्यवस्थेसाठी सहा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये एक तज्ञ डॉक्टरचाही समावेश आहे. वाहनात आरोग्य चिकित्सेसाठी अत्याधुनिक उपकरणे आहेत. आरोग्य चिकित्सा आणि उपचारासाठी येणाऱ्या कामगारांना प्राथमिक आरोग्य केंद्रा प्रमाणेच वैद्यकीय उपचार या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही सिंपीहट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बेळगाव शहरात सुरू झालेल्या या नव्या कामगारांसाठीच्या वैद्यकीय सेवेबाबत आमदार अभय पाटील यांनी समाधान व्यक्त केले. वैद्यकीय पथकाने आपले काम प्रामाणिकपणे पार पाडावे. कामगारांनी या सेवेचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा आणि आपले आरोग्य चांगले ठेवावे. असे आवाहन आम. पाटील यांनी केले. यावेळी सीनियर लेबर इंस्पेक्टर रमेश केरूर, एचएलएलचे समन्वयक अमित उंडाळे व सदस्य, नागरिक उपस्थित होते.