डॉ. भारत पाटील : कुर्ली हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ लढाया करून स्वराज्याची निर्मिती केली इतकेच नाही तर त्यांनी अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले. त्यांनी महिलांना सन्मान दिला. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठी फौज उभी केली, असे मत अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद कॉलेजचे प्रा. डॉ. भारत पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी निपाणी क्रिडा शिक्षण अधिकारी एस. बी. जोगळे होते.
प्रा. डॉ. पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यात अनेक मजबूत कायदे तयार केले. जे सर्वसामान्य माणसाच्या फायद्याचे होते. रयतेला, जनतेला वेठीस धरण्याची त्यांची वृत्ती अजिबात नव्हती. उलट त्यांच्या फायद्याचे अनेक कायदे त्यांनी त्यावेळीच तयार करून त्याचे पालनही केले जात होते. हे कायदे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष एस. बी. जोगळे यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. या विद्यालयामध्ये क्रिडा संकुल उभारण्यासाठी सर्व प्रकारे सहकार्य करू असे सांगितले. केदार मगदूम यांने मनोगत व्यक्त केले.
डी. डी. हाळवणकर यांनी स्वागत केले. एस. एस. चौगुले यांनी प्रस्तावित केले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. टी. एम. यादव यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. जत्राट येथिल किरण मेस्त्री यांनी ‘शिवाजी कोण होता? ‘ या पुस्तकाच्या ३० प्रति विद्यालयास भेट दिल्या.
याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. एस. एस. साळवी यांनी सूत्रसंचालन केले. एस. ए. पाटील यांनी आभार मानले.