आकाश माने : दोन दिवसात विविध उपक्रम
निपाणी (वार्ता) : कोणत्याही जाती धर्मात न अडकता एकसंघ होऊन निपाणी शहरात सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी तसेच जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अखंड जागर व्हावा, यासाठी मावळा ग्रुपची सुरुवात केली. छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या युवा पिढीला समजावेत या उद्देशाने संघटनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने शनिवारी (ता.२६) व रविवारी (ता.२७) फेब्रुवारी रोजी दुर्गराज रायगड मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत युवा नेते बसवप्रसाद जोल्ले व नगराध्यक्ष जयवंत भाटले हे स्वतः सहभागी होणार आहेत, अशी माहिती मावळा ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने यांनी बैठकीत दिली.
यावेळी राहुल भाटले म्हणाले, समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडणार आहे. शनिवारी (ता. २६) रोजी पहाटे पाच वाजता निपाणी येथून मोहिमेला सुरुवात होणार आहे. यावेळी छत्रपती मध्यवर्ती शिवाजी चौकातील शिवपुतळ्यास अभिषेक घालण्यात येणार आहे. तेथून नरवीर तानाजी चौक, कोठीवाले कॉर्नर, कित्तूर चन्नम्मा सर्कल, जुना पीबी रोडमार्गे धर्मवीर संभाजीराजे चौकात आल्यानंतर बसद्वारे मोहिमेचे प्रस्थान होणार आहे.
यादिवशी दुपारी दोन वाजता प्रतापगड येथे गेल्यानंतर येथे दोन तास गडाची माहिती दिली जाणार आहे. यानंतर सायंकाळी रायगड पायथ्याशी मुक्काम असणार आहे. रात्री आठ वाजता इतिहासाचे अभ्यासक रामजी कदम यांचे व्याख्यान होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रायगडावर प्रस्थान करून तेथे दिवसभर छत्रपती शिवरायांच्या इतिहास जाणून घेतला जाणार असल्याचे सांगितले.
सुभाष कदम यांनी, निपाणीतील तरुणांना संघटित करण्याच्या उद्देशाने मावळा ग्रुप कार्यरत असून या मोहिमेसाठी खासदार आण्णासाहेब जोल्ले व मंत्री शशिकला जोल्ले यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सांगितले. यावेळी संजय चिकोडे, माजी नगरसेवक महादेव चव्हाण, विशाल बुडके, शांतिनाथ मुदकुडे, अनिल चौगुले, संजय जंगी, मंगेश लठ्ठे, सागर मिरजे, अभिजीत कागिनकर यांच्यासह मावळा ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. उदय शिंदे यांनी आभार मानले.