‘बिरेश्वर’ शाखेतर्फे सत्कार : सर्जन होण्याची इच्छा
निपाणी (वार्ता) : बालवयापासून ते अगदी एमबीबीएस प्रवेश घेईपर्यंत एक अभ्यास पूर्ण व्यक्तिमत्व असलेल्या शिरगुप्पी (ता. निपाणी) येथील वैष्णवी संभाजी चव्हाण हिला एमबीबीएस साठी सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाल्याने शिरगुप्पी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यानिमित्त एकसंबा येथील बिरेश्वर संस्थेच्या शिरगुप्पी शाखेतर्फे तिचा सत्कार करण्यात आला.
वैष्णवी हिने सांघिक व वैयक्तिक खेळांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन मित्र मैत्रिणींचे सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. वडीलधाऱ्या लोकांचा योग्य तो सन्मान ठेवत शैक्षणिक दृष्ट्या प्रत्येक वर्षी यशाची कमान चढती ठेवली. शिरगुप्पी शाखा बिरेश्वर संस्थेचे अध्यक्ष संभाजीचव्हाण यांची ती मुलगी आहे.
वैष्णवीचे शालेय शिक्षण बेळगाव मराठा मंडळ संचलित निपाणी येथील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूल येथे झाले. दहावीच्या परीक्षेमध्ये तिने तिसरा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर पुढील अकरावी व बारावी या दोन वर्षांच्या शिक्षण कर्नाटकातील प्रथितयश कॉलेजमध्ये पूर्ण केले. तेथे देखील आपल्या शिक्षणाचा ठसा उमटवत ६०० पैकी ६०० गुण मिळवून परीक्षकांना सुद्धा बुचकळ्यात टाकले होते. बारावीचा निकाल लागण्या अगोदर पासूनच तिने जे स्वप्न आपल्या ऊरी बाळगले होते. ते सत्यात उतरवण्यासाठी तिने नॅशनल एलिजिबिलिटी इंटरन्स टेस्ट अर्थात नीटची परीक्षा देऊन तिथे देखील चा॑गली रँक घेऊन एमबीबीएससाठी प्रवेश मिळवला. हा प्रवेश घेतल्यानंतर त्यामध्ये देखील चांगला अभ्यास करून प्रथित यश सर्जन होण्याची इच्छा आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. कार्यक्रमास बिरेश्वर सौहार्द संस्थेचे संचालक, शाखा व्यवस्थापक, कर्मचारी, ठेवीदार व ग्रामस्थ उपस्थित होते. शिवाजी कुंभार यांनी स्वागत केले. संचालक सुनील वडगावे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक पांडुरंग बर्गे यांनी आभार मानले.