बेळगाव : मातृभाषेमुळे मुलांवर संस्कार करणे सोपे होते. त्याशिवाय त्यांच्या शिक्षणाचा पाया घट्ट होतो, असे विचार सामाजिक कार्यकर्ते मारुतीराव सांबरेकर यांनी बाल साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
शहरातील कॅम्प येथील गोगटे रंग मंदिरामध्ये डॉ अनिल अवचट साहित्यनगरी येथे वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे आज शनिवारी आयोजित 21 व्या मराठी बाल साहित्य संमेलनाला उत्साहात प्रारंभ झाला. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित या बाल साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मारुतीराव सांबरेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या नीला आपटे या होत्या. आपल्या उद्घाटनपर भाषणात सांबरेकर म्हणाले, मातृभाषेतून शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना विषयांचे आकलन सोपे होते. त्यामुळेच ज्येष्ठ समाजसेवक नाना शंकरशेठ यांनी देखील ब्रिटिशांच्या काळातच मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरला होता. मातृभाषेतून पुस्तके लिहून महिला शिक्षणाबाबतही त्यांनी जागृती निर्माण केली. विद्यार्थ्यांनी चांगले संस्कार शिक्षण घेऊन आई-वडिलांचे आणि समाजाचे नांव उज्वल करावे. मातृभाषा मराठीचा झेंडा फडकवत ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मराठी अभिमान गीत सादर करण्यात आले. यावेळी दिवंगत डॉ. एन. डी. पाटील, लता मंगेशकर, रमेश देव, सिंधुताई सपकाळ, डॉ. अनिल अवचट, बाबासाहेब पुरंदरे, सुधा नार्वेकर व अपर्णा व्यंकटेश यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. साठे प्रबोधिनीचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. अथर्व गुरव आणि सौम्या पाखरे यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला. मारुतीराव सांबरेकर व अन्य मान्यवरांनी दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन केले. नीला आपटे व अन्य मान्यवरांनी सावित्रीबाई फुले आणि कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन केले.
उद्घाटन सत्रानंतर कथाकथन सत्र झाले. या सत्रामध्ये समृद्धी पाटील (बालिका आदर्श – कथा :आपली माणसं), कुशल गोरल (मराठी विद्यानिकेतन -कथा :जिवलग मित्र), मालती मारुती पाटील (महिला विद्यालय-कथा :आंबोळीची शेत), परशराम वैजनाथ उसणकर (कुमार विद्यामंदिर सरोळी -कथा :पदरा आडची माया) आणि विशाल महादेव शहापूरकर (ठळकवाडी हायस्कूल-कथा : गड आला पण सिंह गेला) या बाल कथाकारांनी आपल्या कथा सादर केल्या. या सत्राचे सूत्रसंचालन छत्रु पाटील यांनी केले.
दुपारच्या दुसर्या सत्रात कविसंमेलन झाले. कविसंमेलनात सृष्टी देसाई, गायत्री आडगावे (दोघी ठळकवाडी हायस्कूल), सर्वेश सुतार, प्रतीक पाटील, प्रियल चौगुले, रोशनी पाटील, हर्षदा वारेकर, रचना पावले (सर्व मराठी विद्यानिकेतन), लावण्या सांबरेकर (महिला विद्यालय), मनाली देवगिरी (विद्यामंदिर सरोळी), स्नेहल दळवी (बालवीर विद्या निकेतन) आणि वेदिका खन्नूकर (बालिक आदर्श) यांनी काव्यवाचन केले. या सत्राचे सूत्रसंचालन बी. जी. शिंदे यांनी केले. तिसर्या सत्रात निला आपटे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यावेळी मारुतीराव सांबरेकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली. इंद्रजीत मोरे यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पवार यांनी केले.
Check Also
काँग्रेस अधिवेशनाला ऐतिहासिक महत्त्व; 26 आणि 27 डिसेंबर रोजी भव्य शताब्दी महोत्सव साजरा : के. सी. वेणुगोपाल
Spread the love बेळगाव : भारतीय राजकारणाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरलेल्या बेळगावमध्ये 1924 साली महात्मा गांधीजींच्या …