Tuesday , September 17 2024
Breaking News

आयपीएलचा विजेता गुजरात की राजस्थान?

Spread the love

अहमदाबाद : दोन प्रतिभावान कर्णधार, दोन तुल्यबळ संघ, एका संघाचे पदार्पणातच जेतेपदाचे लक्ष्य, तर दुसऱ्या संघाचे १४ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न. सामना एक, पटकथा अनेक. आज इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १५व्या हंगामाच्या अंतिम लढतीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार असून दोन्ही संघांचा इतिहास घडवण्याचा मानस आहे.
अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातला हंगामाआधी झालेल्या ‘आयपीएल’ खेळाडू लिलाव प्रक्रियेअंती अनेक क्रिकेट समीक्षक स्पर्धेतील सर्वात दुबळा संघ म्हणून संबोधत होते. हार्दिक, रशीद खान, शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि लॉकी फग्र्युसन यांसारख्या काही अनुभवी खेळाडूंचा अपवाद वगळता इतरांकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. डेव्हिड मिलरसारख्या खेळाडूमध्ये आता विजयवीराची भूमिका बजावण्याची क्षमता उरलेली नाही. राहुल तेवतियासारख्या खेळाडूवर अवलंबून राहणे योग्य नसल्याचे म्हटले जात होते. मात्र, या सर्व खेळाडूंनी वेळोवेळी आपली कामगिरी उंचावल्याने गुजरात हा यंदा सर्वाधिक सामने जिंकणारा संघ म्हणून पुढे आला. त्यांनी १४ पैकी १० साखळी सामने जिंकण्याची किमया साधली. गुणतालिकेत अग्रस्थान पटकावल्यानंतर त्यांनी ‘क्वॉलिफायर-१’मध्ये राजस्थानला शह देत अंतिम फेरी गाठली. आता त्यांचे पहिल्याच हंगामात जेतेपद मिळवण्याचे लक्ष्य असेल.
‘आयपीएल’च्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकाच संघाला पदार्पणात जेतेपदाला गवसणी घालण्यात यश आले आहे. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने २००८मध्ये ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामात ही कामगिरी केली होती. त्यानंतर राजस्थानला अंतिम फेरीचा टप्पाही गाठता आला नाही. यंदा मात्र संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी १४ पैकी ९ साखळी सामने जिंकले. त्यानंतर त्यांना ‘क्वालिफायर-१’च्या सामन्यात गुजरातने पराभूत केले. परंतु त्यानंतर त्यांना ‘क्वॉलिफायर-२’च्या सामन्यात बंगळूरुवर मात करण्यात यश आले. आता अंतिम सामन्यात त्यांचा १४ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल.

About Belgaum Varta

Check Also

विनेश फोगटची रौप्य पदक मागणीची याचिका क्रीडा लवादाने फेटाळली

Spread the love  नवी दिल्ली : भारताची पैलवान विनेश फोगाट हिला मोठा धक्का बसला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *