कोल्हापूर : : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाविरोधात कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी या दोन्ही खासदारांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याचे म्हटले आहे.
खासदार संजय मंडलिक यांच्या माध्यमातून रेल्वे बोर्डावरचे सदस्य म्हणून नियुक्ती झालेल्या शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आंध्र प्रदेशमध्ये राजकीय सत्तापालटानंतर आज पुन्हा एकदा रेड्डी यांच्या कुटुंबातीलच व्यक्ती मुख्यमंत्री आहे असं म्हणत शिवसेनेमुळे आणि कोल्हापूरच्या मतदारांमुळे आपण खासदार आहात हे विसरून चालणार नाही असा सबुरीचा सल्लाही शिवसैनिकांनी दिला आहे.
घरासमोर कितीही बंदोबस्त लावा, शिवसैनिक राजकीय वचपा काढणारच
खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील घराला तगडा पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. त्यावरून शिवसेनेचे जिल्हा समन्वयक हर्षल सुर्वे यांनी इशारा दिला आहे. घरासमोर कितीही बंदोबस्त लावला, तरी शिवसैनिक याचा राजकीय वचपा काढल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच त्यांनी दिला आहे.