खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी नवीन बोर्डिंग बांधण्यात आले असले तरी त्यामध्ये गेली दीड-दोन वर्ष विद्यार्थ्यांना त्या बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी अजूनही देण्यात आलेली नाही. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी संघटनेच्या वतीने गेल्या आठवड्यात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. परंतु अजूनही त्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. त्यासाठी आज आखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने तहसीलदार कचेरी खानापूर या ठिकाणी मोर्चा काढून उपतहसीलदारांना निवेदन देण्यात आले व त्यानंतर महामार्गावरील राजा श्रीशिवछत्रपती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सदर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करण्यास सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, कार्यदर्शी गुंडू तोपिनकट्टी, दलित संघटनेचे नेते राजू कांबळे, ऍड.आकाश अथणीकर, रवीगौडा पाटील यांनी त्याची दखल घेऊन उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. आज सायंकाळपर्यंत जर या गोष्टीवर निर्णय झाला नाही तर सदर चौकामध्ये बसूनच आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला असून तशी तयारी केली असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख मंजुनाथ यांनी दिली आहे. यावेळी बरेच विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा समूह उपस्थित होता.
यावेळी सीपीआय मंजुनाथ नायक पोलीस फौजफाट्यासह आंदोलनस्थळी हजर होते.