चंदगड : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर तात्पुरता पडदा टाकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बुधवारी (14 डिसेंबर) दिल्लीत बैठक पार पडली. पण त्यानंतर लगेचच महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई हे बेळगावच्या सीमेला लागूनच असलेल्या शिनोळी गावात जाणार आहेत. मराठी भाषिकांना आधार देण्यासाठी आपण चाललो असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्नामुळे निर्माण झालेला वाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बैठक घेऊन काही तास उलटत नाहीत तोपर्यंत आपण बेळगाव सीमेवर जाणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केलं आहे. बेळगावपासून अगदी जवळ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील शिनोळी गावात ते शुक्रवारी (16 डिसेंबर) जाणार आहेत. अर्थात शंभूराज देसाईंच्या या दौऱ्यावर कर्नाटकाकडूनही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई बेळगावमध्ये न जाता बेळगाव सीमेवरच्या शिनोळी गावात जाणार आहेत.