निपाणी (वार्ता) : कोल्हापूर येथील चित्रपट निर्माते मंगेश गोटुरे आणि निपाणीतील लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या ‘गाभ’ या मराठी चित्रपटाचा फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जागतिक प्रतिष्ठेच्या कान्स चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रिमिअर गुरुवारी झाला. कान्स महोत्सवामध्ये ‘गाभ’चा जागतिक प्रिमिअर होणे, हा आमच्यासाठी सर्वाधिक आनंदाचा व समाधानाचा क्षण आहे, अशी भावना निर्माते गोटुरे व दिग्दर्शक जत्राटकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजार- २०२३’ साठी निवडण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट पाच चित्रपटांमध्ये चौथ्या क्रमांकावर ‘गाभ’ होता. तथापि, शासनाच्या वतीने पहिले तीन चित्रपट फिल्म बाजारसाठी पाठविण्यात आले. त्यामुळे ‘गाभ’चे निर्माते गोटुरे यांनी ‘कान्स मार्श ड्यु फिल्म २०२३’ या विभागासाठी स्वतंत्र प्रवेशिका पाठविली. त्याअंतर्गत ‘गाभ’चा जागतिक प्रिमिअर झाला.
या विभागांतर्गत आज प्रिमिअर झालेल्या चित्रपटांमध्ये तीनभारतीय चित्रपट होते. त्यात दिग्दर्शक सुदिश कनौजिया यांच्या ‘ल’वास्टे’ (हिंदी, ११३ मि.) आणि हैदर काजमी यांच्या ‘बँण्डिट शकुंतला’ (हिंदी, १२० मि.) यांसह अनुप जत्राटकर दिग्दर्शित ‘गाभ’ (मराठी, १२० मि.) या चित्रपटांचा समावेश राहिला. याशिवाय, स्वित्झर्लंड व भारत यांची संयुक्त निर्मिती असलेला, दिग्दर्शक कमल मुसळे यांचा ‘मदर तेरेसा अँड मी’ (इंग्रजी, १२२ मि.) या चित्रपटाचाही समावेश होता. यामध्ये दीप्ती नवल यांची भूमिका आहे.
टाइमलॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टीमीडिया प्रोडक्शनची निर्मितीअसलेला ‘गाभ’ हा सामाजिक समस्याप्रधान चित्रपट आहे. यामध्ये कैलास वाघमारे, सायली बांदकर, उमेश बोळके, विकास पाटील आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. गीते आणि संगीत चंद्रशेखर जनवाडे यांचे असून संकलन व पार्श्वसंगीत रविंद्र चांदेकर यांचे आहे.
वीरधवल पाटील यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे. यातील गीतांना आनंद शिंदे, प्रसेनजीत कोसंबी आणि सावनी रविंद्र यांचा स्वरसाज लाभला आहे. सुंदर कुमार यांनी कलादिग्दर्शन तर फुलवा खामकर यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.