खानापूर : मागील दोन दिवसांपासून पश्चिम घाटात धुवाधार पाऊस सुरू झाल्यामुळे खानापूर तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक गावातील पूल व बंधारे पाण्याखाली आल्यामुळे खानापूर शहराशी कांही गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील जवळपास 40 गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. सतत पडत असणाऱ्या पावसाने हबनहट्टी येथील साधूचे भाकीत मात्र खोटे ठरविले आहे.
बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही खानापूर तालुक्यामध्ये झालेली आहे. तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेल्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे पोलीस प्रशासन बंदोबस्तात वाढ करत या भागातील वाहतूक बंद ठेवली आहे. नदीकाठच्या जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सततच्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. तीन भागातील अनेक गावांमध्ये झाडे उन्मळून पडली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे तर काही गावांमध्ये विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला आहे. खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामीण भागासह खानापूर शहर देखील मागील दोन दिवसापासून गारठलेले आहे. सततच्या पावसामुळे बाजारपेठ ओस पडली आहे तर ग्रामीण भागांमध्ये भात लागवडीला वेग आला आहे.