बेळगाव : सततच्या पावसामुळे अलारवाड क्रॉस येथील रस्त्याशेजारी शेतवडीत चार-पाच विजेचे खांब गेल्या चार दिवसापासून उन्हाळून पडलेले आहेत. स्थानिक नागरिकांनी हेस्कॉमकडे रीतसर तक्रार करून देखील ते विद्युत खांब हटविण्यात आलेले नाहीत त्यामुळे जीवितहानी झाल्यानंतरच हेस्कॉमला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल या भागातील शेतकरी विचारत आहेत.
मागील चार दिवसांपासून हे विद्युत खांब पाण्याने भरलेल्या शेतात पडलेले आहेत. खांब कोसळल्यामुळे विद्युत तारा शेतात विखुरल्या आहेत. यामुळे शेतात काम करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करून देखील अद्याप हेस्कॉमचे कर्मचारी याठिकाणी फिरकले देखील नाहीत त्यामुळे हेस्कॉमच्या या ढिसाळपणावर शेतकरी व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या शेतीच्या कामाना वेग आला आहे. अश्या परिस्थिती शेतात कोसळलेल्या विद्युत खांबामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. चार दिवसांपासून शेतात उन्मळून पडलेले खांब तात्काळ दुरुस्त करावी, अशी मागणी अलारवाड क्रॉस येथील शेतकऱ्यांनी केली आहे.