खानापूर : खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीच्या नंदगड मुख्य कार्यालयाचा खत विक्रीचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आल्याची माहिती ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी यांनी आज खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना कोळी म्हणाले की, खानापूर तालुक्यातील नंदगड तालुका मार्केटिंग सोसायटीत खत विक्रीत होत असलेल्या गैरप्रकाराबाबत आमच्या नेत्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणाची चौकशी करून जिल्हाधिकार्यांनी त्यात गैरप्रकार आढळून आल्याने त्यांचा परवाना तात्पुरता रद्द केला आहे. चांगले नाव कमावलेल्या या सोसायटीची उभारणी बसप्पाण्णा अरागम यांनी केली असून, माजी आ. अरविंद पाटील अध्यक्ष झाल्यानंतर भ्रष्टाचार वाढला आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने या संस्थेचे व्यवस्थापन मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
तालुका काँग्रेस एससी-एसटी अध्यक्ष लक्ष्मण मादार यांनी सांगितले की, कोणत्याही पक्षाने कोणताही आरोप केला नसून, अधिकाऱ्यांनीच ही चोरी शोधून काढली, विरोधी काँग्रेस पक्ष व आमच्या नेत्या डॉ. अंजली निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी यांच्या माध्यमातून चौकशीसाठी तहसीलदार, जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर तपासणीत हे खत चढ्या भावाने विकल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्याचे पालक मंत्री व जिल्हाधिकारी आले असता त्यांनी त्यांना खडे बोल सुनावले. हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सोसायटीचा खतविक्री परवाना तात्पुरता रद्द केला आहे.
एकूणच तालुका मार्केटिंग सोसायटीवर ब्लॉक काँग्रेसने गंभीर आरोप केले असून या संदर्भात पुढील राजकीय खेळी कशी होते ते पाहावे लागेल.