मुंबई : शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली. या भेटीत ईडी (ED) कारवाईबाबत चर्चा झाल्याचं समजतं. जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयाला ईडीची नोटीस आल्याने चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक झाली. या बैठकीतून मार्ग काढण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, असंही सूत्रांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील हे अजित पवार गटाला पाठिंबा देणार?
गेल्या काही दिवसांपूर्वी जयंत पाटील हे अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर प्राथमिक चर्चा झाल्याचीही माहिती होती. काल पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात गुप्त बैठक झाल्याचं समोर आलं. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयाला ईडीची नोटीस आली, त्यातून मार्ग काढण्यासाठीच ही गुप्त बैठक पार पडल्याचं समजतं. लवकरच जयंत पाटील हे अजित पवार गटाला पाठिंबा देऊन त्यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचं कळतं.