निपाणी (वार्ता) : कुन्नूर येथील दूधगंगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची (पीके पीएस) निवडणूक रविवारी (ता.१०) चुरशीने झाली. त्यामध्ये बोरगाव येथील सहकाररत्न उत्तम पाटील गट पुरस्कृत पॅनलने भरघोस विजय मिळवित स्थापनेपासून भाजप गटाकडे असणाऱ्या संस्थेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार निबंधक खात्याचे अमित शिंदे यांनी काम पाहिले.
या संघाकरीता झालेल्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत रविवारी (ता.१०) दुपारपर्यंत मतदान झाले. यामध्ये उत्तम पाटील गटाने यश मिळविले. संघाच्या नूतन संचालकपदी अनिल सकान, चैतन्य चेंडके, रामचंद्र जाधव, लक्ष्मण कांबळे, शिवचंद्र तावदारे, विजय नाईक, अजित कोणे, उमा राजेंद्र पाटील, जयश्री अरुण निकम, मीनाक्षी राजेंद्र तावदारे, पल्लवी बुरुड, पंडित हेगडे यांची निवड करण्यात आली आहे.
निवडीनंतर संस्थेच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासत सर्वांगीण विकास करू. सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम करून संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही नवनिर्वाचित सदस्यांनी दिली. उत्तम पाटील यांनी पॅनेलला शुभेच्छा देवून संघाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.