खानापूर : हनुमान नगर बेळगाव येथे प्लंबिंग कामासाठी गेलेल्या खानापूर तालुक्यातील वड्डेबैल येथील एका प्लंबर कामगाराचा विद्युतभारित विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. सदर घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या घटनेत मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव महेश परशराम पाटील (वय 21 वर्षे) राहणार वड्डेबैल ता. खानापूर असे आहे. याप्रकरणी बेळगाव येथील एपीएमसी पोलीस स्थानकात संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. सदर युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. त्याच्यावर मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास वड्डेबैल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेळगाव येथील हनुमान नगर येथील मुख्य कंत्राटदार अभिजीत फकीराप्पा शिवयोगीमठ यांच्या अंतर्गत, सब ठेकेदार म्हणून लक्ष्मण मंजळकर राहणार अनगोळ याच्या मार्फत महेश परशराम पाटील हे प्लंबर काम करण्यासाठी बेळगाव हनुमान नगर येथे दररोज कामाला जात होते. दुपारी काम करत असताना हातामध्ये असलेल्या ग्राइंडर मशीन मधील विद्युतभारित तार तुटल्याने त्याला स्पर्श झाला, त्यामुळे तो जागीच ठार झाल्याचे कळते. याप्रकरणी सदर कंत्राटदार लक्ष्मण मंजळकर याच्या विरोधात बेळगाव एपीएमसी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महेश हा वडेबैल येथील परशराम पांडुरंग पाटील यांचा एकुलता एक चिरंजीव असुन तो काही दिवसापासून पुणे या ठिकाणी प्लंबिंग कामाला होता. पण तेथून तो काम सोडून आपल्या गावी आला होता. व नंदीहळी येथील आपल्या मामाच्या घरातून बेळगाव येथे कामाला जात होता. आज नेहमीप्रमाणे बेळगाव येथे कामाला गेला होता. व काम करत असताना अचानकपणे विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी व आजोबा असा परिवार आहे. त्याच्या आकस्मित मृत्यू झाल्याने चापगाव परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.