Friday , October 18 2024
Breaking News

मराठा आरक्षणाच्या नव्या अध्यादेशावर छगन भुजबळांचा आक्षेप; “ही भूमिका राष्ट्रवादीची नाही”, प्रफुल्ल पटेलांनी हात झटकले

Spread the love

 

मुंबई : राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या नव्या अध्यादेशात सगेसोयरेंबाबतची मनोज जरांगे यांची मागणी मान्य केली आहे. मात्र यावर मंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांनी या अध्यादेशावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, यासंदर्भात अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता ती भूमिका राष्ट्रवादी पक्षाची नाही असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या आक्षेपावर हात झटकले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) खासदार प्रफुल्ल पटेल बोलताना म्हणाले की, “छगन भुजबळ ओबीसींच्या बाबतीत आपली भूमिका समता परिषदेच्या माध्यमातून मांडत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते समता परिषदेचे काम करत आहेत. ओबीसींच्या आणि मराठ्यांच्या आरक्षणासंबंधी त्यांची भूमिका ही समता परिषदेच्या माध्यमातून असते. ती भूमिका राष्ट्रवादी पक्षाची नसते.”

भाजप, शिंदे गटानं आरक्षणाचा गुलाल उधळला, पण अजित पवार गट अनुपस्थित?
मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य झाल्यानं मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे यांनी आपलं आमरण उपोषण संपवलं. जरांगे यांचे उपोषण मागे घेताना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा हजर होते. मात्र, याचवेळी अजित पवार गटातील एकही मंत्री उपस्थित नव्हता. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळाला होता. तसेच, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सातत्यानं मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे चर्चा रंगल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

“प्रेयसी एक आठवण” या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीवर आधारित निघणार चित्रपट..

Spread the love  ठाणे : ” प्रेयसी एक आठवण ” ही सत्य प्रेम स्वरूप कादंबरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *