निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची इंस्पायर अवार्ड साठी निवड झाली. भारत सरकारने विद्यार्थ्यांमधील संशोधकवृत्तीला चालना देण्यासाठी इंस्पायर अवार्ड योजना सुरू केली. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार व नॅशनल इनोव्हेशन फौंडेशन यांच्या मार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प मागविले जातात.
यावर्षी कुर्ली हायस्कूलचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक एस. एस.चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेयस एकनाथ साळवी याने भुईमूग शेंगा सोलनी यंत्र, सुयश केदारी चौगुले यांने भुईमूग शेंगा तोडणी उपकरण, श्रेया सुनील मगदूम हिने कचरा निर्मुलन यंत्र, साक्षी सतीश माळी हिने नाविन्यपूर्ण अपंगांना उपयुक्त उपकरण, शिवानी प्रविण राऊत हिने बहुउद्देशीय गोठा स्वछता उपकरण तयार केले आहे. या सर्व उपकरणांची नाविन्यता व उपयोगिता याच्या आधारे निवड करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येकी दहा हजार इंस्पायर शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे.
इंस्पायर अवार्ड योजना सुरु झाल्या पासून आज पर्यंत कुर्ली हायस्कूलच्या २३ विद्यार्थ्याना इंस्पायर शिष्यवृत्ती मिळाली आहे. यापैकी पाच प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर व १२ प्रकल्प राज्य स्तरांवर सहभागी झाले आहेत. इंस्पायर अवॉर्डसाठी इतके प्रोजेक्ट निवड होणारे बेळगाव विभागातील कुर्ली हायस्कूल हे एकमेव हायस्कूल आहे. या हायस्कूलने विज्ञान प्रदर्शनात सातत्याने यश संपादन करून चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याचा व निपाणी तालुक्याचा नावलौकिक केला आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यींनींना संस्थेचे दक्षिण विभागीय अध्यक्ष डॉ. एम.बी. शेख, विभागीय अधिकारी व्ही. डी. हणशी, चिक्कोडी जिल्हा उपसंचालक मोहन हांचाटे, डायट प्राचार्य मोहन जिरगीहाळ, नोडल अधिकारी यु. ए. मुल्ला, निपाणी गट शिक्षणाधिकारी महादेवी नाईक, विज्ञान विषय पर्यवेक्षक एच. एस. खाडे, बीआरसी आर. ए. कागे यांचे सहकार्य लाभले.