खानापूर म. ए. समितीच्या बैठकीत चर्चा
खानापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत कारवार मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उमेदवार उभा करण्यासाठी खानापूर तालुक्याची एक व्यापक बैठक बोलावून उमेदवार देण्याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे. तसा विचार बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वांच्या विचारातून पुढे आला. शुक्रवारी शिवस्मारकात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते.
इतिहासात आत्तापर्यंत कारवार मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उमेदवार दिला गेला नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची मते आजपर्यंत राष्ट्रीय पक्षाला जात होती. परंतु कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांचा व मराठी भाषेचा आदर केलेला नाही. कर्नाटकात आलेल्या कोणत्याही पक्षाच्या सरकारने मराठी माणसांना पायदळी तुडवण्याचाच प्रयत्न केला आहे. त्यामुळे यापुढे कोणत्या तरी पक्षाला मते देऊन मोठं करण्यापेक्षा म. ए. समितीच्या उमेदवाराला मते दिलेले उत्तम होईल. त्यातच खानापूर, जोयडा, हल्याळ व कारवार तालुक्यात बहुसंख्य मराठी भाषिक आहेत. त्यांची मते निश्चितच म. ए. समितीच्या उमेदवाराला पडणार आहेत. त्यामुळे म. ए. समितीचा उमेदवार निवडून येण्याची परिस्थिती आहे. त्यामुळेच म. ए. समितीचा उमेदवार देण्याचा विचार करण्यात येत आहे.
सीमा भागातील दुकानांवर कानडी बोर्ड लावावेत म्हणून कर्नाटक सरकारने जी सक्ती करत आहेत त्याबद्दल तसेच “जय महाराष्ट्र” म्हणण्यास विरोध करणाऱ्या श्रीकांत देसाई यांचा आणि पोलिसांनी विनाकारण समिती युवा नेते शुभम शेळके यांना अटक केल्याप्रकरणी पोलिसांचाही या बैठकीत निषेध करण्यात आला.
यावेळी खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, माजी जि. पं. सदस्य जयराम कृष्णाजी देसाई, उपाध्यक्ष कृष्णा कुंभार, उपाध्यक्ष रमेश मल्हारी धबाले, सहचिटणीस रणजित पाटील, खजिनदार संजय पाटील, उपखजिनदार पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, अजित पाटील, ब्रामानंद पाटील, देवाप्पा भोसले, बाळासाहेब शेलार, माजी सभापती मारुती परमेकर, प्रकाश चव्हाण, मारूती धबाले, नागेश भोसले, जोतिबा पाटील, गोपाळ पाटील, भरत पाटील, ऍड. अरुण सरदेसाई, मुकुंद पाटील, एस. एच. गुरव, पांडुरंग तुकाराम सावंत, मल्हारी खांबले, वसंत नावलकर, परशराम चोपडे, रवींद्र शिंदे आदि उपस्थित होते.