बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी, संघटनेच्या भिवशी येथे काल बुधवारी पार पडलेल्या बैठकीत म. ए. समितीचे कारवार लोकसभेचे उमेदवार निरंजन सरदेसाई तसेच बेळगाव मधील उमेदवार महादेव पाटील यांना जाहीर समर्थन देऊन पाठिंबा देण्यात आला. तसेच हुबळी येथील दुर्दैवी कन्या नेहा हिरेमठ हिला श्रद्धांजली वाहण्यात आली.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे मार्गदर्शक सुनील किरळे हे होते. बैठकीत बोलताना युवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीद्वारे सध्या सुरू असलेल्या कन्नड सक्ती विरोधात समितीची ताकद दाखवण्याची संधी आहे. कन्नड सक्ती विरोधातील असंतोष हा मतांच्या स्वरूपात बाहेर पडून “मराठे खडे तो सरकार से बडे” हे कुठेतरी दाखवून देण्याची संधी चालून आली आहे, असे मत व्यक्त केले. उपाध्यक्ष कपिल बेलवळे यांनी निपाणी पालिकेवरील भगवाची अवहेलना थांबली पाहिजे यासाठी संघटित होऊन काम करू. मतदारांनी पालिकेवर जीर्ण झालेला भगवा पाहून मतदान करावे, असे विचार व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी हातकणंगले येथे संघटनेने तसेच निपाणी महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष जयराम मिरजकर, युवा नेते शुभम शेळके यांची भेट दिली होती. त्यावेळी या कन्नड सक्ती विषयी बैठकीसाठी शब्द दिला होता. त्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही संघटनेचे सचिन रमेश कुंभार यांनी दिली.
गेल्या विधानसभेत जे झाल गेलं विसरून त्यातून शिकून संघटनेची ताकद वाढवण्यासाठी तसेच येणारी विधानसभा स्वतःच्या पायावर उभे राहून लढण्यासाठी सर्वांनी वेळ देऊन काम करूया. या नवीन वर्षात संघटना विविध उपक्रम हाती घेणार असून त्यासोबत मागील झालेला रोजगार मेळावा संघटना पुढील वर्षी पार पडणार असा बैठकीत ठराव संमत करण्यात आला. यावेळी ध्येयधोरणानुसार म. ए. समितीचे शुभमदादा शेळके यांच्या नेतृत्वात काम करून निपाणीमध्ये सीमा लढा मोठा करण्याचा ठाम निर्णयही घेण्यात आला. बैठकीस संघटनेचे पदाधिकारी, मार्गदर्शक तसेच भिवशी, यमगर्णी, जत्राट, मांगुर, निपाणी, अककोळ गावचे सहकारी -मित्र हजर होते.