Friday , November 22 2024
Breaking News

काँग्रेसचे सरकार आल्यावर आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे नेऊ : राहुल गांधींची मोठी घोषणा

Spread the love

 

नवी दिल्ली : आरक्षणाच्या मागणीसाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये मोठी आंदोलने झालेली गेल्या काही काळात पाहायला मिळाली आहेत. महाराष्ट्रातही मराठा आरक्षणासह इतर काही जातसमूहांचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमिवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोठी घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा आमचे सरकार आल्यास हटवून टाकू, असे राहूल गांधी म्हणाले. या निर्णयाचा लाभ दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी जमातींना होणार असल्याचेही ते म्हणाले. धर्माच्या आधारावर आरक्षणाचा आरोप काँग्रेसवर करण्यात आला होता. या आरोपाला या माध्यमातून राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

रतलाम येथील सभेला संबोधित करत असताना राहुल गांधी म्हणाले, “ही निवडणूक संविधानाला वाचविणारी निवडणूक ठरणार आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ संविधानाला संपवू इच्छितो. यासाठी त्यात बदल करणार असल्याचे त्यांचे नेते सांगतात. काँग्रेस आणि इंडिया आघाडी संविधानाचे रक्षण करण्याची लढाई लढत आहे. संविधानाने इथल्या लोकांना जल, जमीन आणि जंगल या साधनसंपत्तीवर अधिकार दिले. नरेंद्र मोदींना हे अधिकार हिसकावून घ्यायचे असल्यामुळेच त्यांना पूर्ण बहुमत हवे आहे.” राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन हा मुद्दा लोकांना सांगितला.

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे नेऊ
राहुल गांधी यांनी भाजपाच्या ४०० पार घोषणेवरही टीका केली. ते म्हणाले, भाजपाच्या नेत्यांनी संविधान बदलण्यासाठी ४०० जागा जिंकून द्या, असे आवाहन केले आहे. पण ४०० विसरा, त्यांना आता १५० जागाही जिंकणे अवघड झाले आहे. ते सांगतात की, सत्तेत आल्यानंतर आरक्षण हटवू. पण मी आज या मंचावरून जाहीर करतो की, आरक्षण कुणी हटवू शकत नाही. उलट आम्ही जर सत्तेत आलो तर आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्याही पुढे नेऊ. गरिब, दलित, वंचित आणि आदिवासींना अधिकाधिक आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राहुल गांधी यांनी केलेल्या घोषणेनंतर प्रचार आणखी शिगेला पोहोचल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आरोप करत असताना ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचे म्हटले होते. काँग्रेसने या आरोपाचे त्याचवेळी खंडन केले होते.

गुजरात येथे संपन्न झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी काँग्रेसच्या राजकुमाराला (शेहजादा) आणि त्यांचा पक्ष व समर्थकांना आव्हान देतो की, त्यांनी धर्माच्या नावावर आरक्षणाचा गैरवापर करणार नाही, हे जाहीर करावे. तसेच धर्माच्या नावावर आरक्षण देण्यासाठी ते संविधानाची खेळ करणार नाहीत.” याशिवाय इतर अनेक ठिकाणी मोदी यांनी काँग्रेसवर आरोप करताना त्यांना धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायचे असल्याचे म्हटले होते.

आदिवासींवरील अत्याचाराला वाचा फोडली जात नाही
रतलाम येथील सभेत राहुल गांधी यांनी आदिवासींवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, आदिवासींविरोधात होणाऱ्या अत्याचाराची बातमी दाखविली जात नाही. आदिवासींच्या मुलींवर बलात्कार होतात. त्यांची जमीन बळकावली जाते. पण माध्यमे मौन बाळगून असतात. त्याला कारण म्हणजे आदिवासींचे माध्यमांत प्रतिनिधित्व नाही.

About Belgaum Varta

Check Also

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Spread the love  जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी सुरक्षा दलाच्या जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *