Friday , September 20 2024
Breaking News

राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या मतदान

Spread the love

 

२२७ उमेदवारांचे ठरणार राजकीय भवितव्य; २.५९ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

बंगळूर : चुरसीने होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या (ता. ७) राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मुक्त आणि निष्पक्ष मतदानासाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी केली असून मतदान केंद्रांसमोर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सर्व १४ मतदारसंघातील मतदान केंद्रांवर नियुक्त केलेले कर्मचारी निवडणूक साहित्यासह आज सायंकाळपर्यंत येऊन दाखल झाले. कालच जाहीर प्रचाराची सांगता झाल्याने उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदान याचना केली.
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र, एस. बंगारप्पा आणि अभिनेते शिवराजकुमार यांच्या पत्न गीता शिवराजकुमार, शिमोगामध्ये बंडखोर उमेदवार माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, जगदीश शेट्टर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, बी. श्रीरामुलू, तुकाराम, एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डमणी, उमेश जाधव, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, मंत्री उमेश खांड्रे यांचे पुत्र, सागर खांड्रे, प्रभा मल्लीकार्जून, संयुक्त पाटील, भगवंत खोबा यांच्यासह दिग्गज उमेदवारांचे भवितव्य उद्या मतदार राजा निश्चित करणार आहे. १४ मतदार संघात यामध्ये २०६ पुरुष आणि २१ महिला उमेदवार असे एकूण २२७ स्पर्धक रिंगणात आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केपीसीसी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि इतर नेत्यांनी १४ मतदारसंघात प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, डी. व्ही. सदानंदगौडा, विरोधी पक्षनेते आर. अशोक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी आपल्या पक्षांच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला.

लोकसभा मतदारसंघ
बागलकोट, चिक्कोडी, बेळगाव, विजापूर, गुलबर्गा, रायचूर, बिदर, कोप्पळ, बेळ्ळारी, हावेरी, धारवाड, उत्तर कन्नड, दावणगेरे, शिमोगा जिल्ह्यात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.
२.५९ कोटी मतदार
या १४ मतदारसंघात एकूण दोन कोटी ५९ लाख ५२ हजार ९५८ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. यामध्ये एक कोटी २९ लाख ४८ हजार ९७८ पुरुष, एक कोटी २९ लाख ६६ हजार ५७० महिला, एक हजार ९३५ इतर आणि ३५ हजार ४६५ सेवा मतदार आहेत. यामध्ये सहा लाख ९० हजार ९२९ युवा मतदार, ८५ वर्षावरील दोन लाख २९ हजार ५६३ मतदार आणि तीन लाख ४३ हजार ९६६ अपंग मतदार आहेत.
पाणी, वैद्यकीय व्यवस्था
दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) इशारा दिला आहे की निवडणुकीच्या दिवशी उत्तर कर्नाटक प्रदेशातील तापमान ४५-४६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
कर्नाटक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या अधिका-यांनी सांगितले की आयएमडीकडून माहिती प्राप्त होत असून सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मतदानाच्या दिवशी पुरेसे पिण्याचे पाणी, पंखे आणि सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त सीईओ व्यंकटेश कुमार आर. म्हणाले की, प्रत्येक मतदान केंद्रावरील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये तयारी करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने सर्व आरोग्य केंद्रांवर पुरेशी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच, प्रत्येक मतदान केंद्रावर आशा कार्यकर्त्या किंवा असिस्टंट नर्स मिडवाइफ वर्कर, ओआरएससह वैद्यकीय किट आणि इतर साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे.
दरम्यान, निष्पक्ष निवडणुका आणि मतदानाची गुप्तता सुनिश्चित करण्यासाठी मतदानादरम्यान मोबाईल फोनला परवानगी दिली जाणार नाही, असे निवडणुक अधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदानापूर्वी मतदारांना त्यांचे फोन ठेवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतंत्र ट्रे किंवा काउंटरची व्यवस्था केली आहे. मतदान क्षेत्रात स्मार्ट घड्याळांनाही परवानगी नाही.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर वार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत 2024 घरगुती मखर सजावट स्पर्धेचा बक्षिस समारंभ संपन्न

Spread the love  खानापूर : खानापूर वार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत 2024 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *