Monday , September 21 2026
Breaking News

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी डी. के. शिवकुमार यांची निवड

Spread the love

 

बुधवारी लोकभवनात होणार शपथविधी

बंगळूर : कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची शनिवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आता शिवकुमार राज्यपालांची भेट घेऊन नवीन सरकार स्थापनेचा दावा सादर करतील. दरम्यान, बुधवारी (ता. ३) बंगळुरातील लोकभवनातील ‘ग्लास हाऊस’मध्ये हा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती कॉंग्रेस पक्षातर्फे शनिवारी देण्यात आली.

विधानसौध येथे सायंकाळी ४ वाजता झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी डी.के. शिवकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. माजी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी या प्रस्तावास अनुमोदन दिले. त्यानंतर उपस्थित सर्व आमदारांनी एकमताने या प्रस्तावाला मंजुरी दिली.

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीपसिंह सुरजेवाला यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवकुमार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड जाहीर करण्यात आली.

बैठकीपूर्वी डी.के. शिवकुमार यांनी विधानसौधातील कक्षात विशेष पूजा केली. तसेच सीएलपी बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सर्व आमदारांच्या जागेवर जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करून संवाद साधला.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, “मी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाचा तसेच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. पुढील नेत्याची निवड करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविला होता.”

दरम्यान, विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर डी.के. शिवकुमार सायंकाळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन नवीन सरकार स्थापनेचा दावा सादर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची औपचारिक घोषणा होण्याची अपेक्षा आहे.

लोकभवनात शपथविधी

राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांच्या शपथविधी सोहळ्याची अधिकृत घोषणा काँग्रेसने केली आहे. ३ जून रोजी बंगळुरातील लोकभवनातील ‘ग्लास हाऊस’मध्ये हा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती पक्षाने शनिवारी दिली.

यापूर्वी शिवकुमार यांचा शपथविधी विधानसौधाच्या पायऱ्यांवर होणार असल्याची चर्चा होती. मात्र, केपीसीसीचे कार्याध्यक्ष जी.सी. चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, शपथविधी लोकभवनातच होणार असून कार्यक्रमाची वेळ आज सायंकाळपर्यंत निश्चित केली जाईल.

चंद्रशेखर म्हणाले की, इंधनदरवाढीच्या पार्श्वभूमीवर तसेच नागरिकांना वाहतूक आणि इतर गैरसोयी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आणि आडंबरयुक्त कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक आणि चाहत्यांनी याला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शपथविधीच्या पहिल्या टप्प्यात किती मंत्री शपथ घेणार याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून, याबाबत काँग्रेस हायकमांड निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले ज्येष्ठ नेते डॉ. जी. परमेश्वर आणि एम. बी. पाटील यांना दिल्ली दौऱ्यानंतरही कोणतेही स्पष्ट आश्वासन मिळाले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परमेश्वर यांनी किमान उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यांनाही अपेक्षित यश मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे.

आज सकाळी डी. के. शिवकुमार यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची लोकभवनात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी नागराबावी येथील अज्जय्या शाखा मठात जाऊन पादुकांचे दर्शन घेतले.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *