Saturday , May 30 2026
Breaking News

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मध्यवर्ती म. ए. समितीचा निर्वाणीचा इशारा; अन्यथा 29 जून रोजी निवासस्थानी धरणे आंदोलन….

Spread the love

 

बेळगाव : सरकारी कार्यालये, दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील नामफलकांवर ६० टक्के कन्नड भाषेसोबत ४० टक्के मराठी भाषेला प्राधान्य देऊन तिची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी तसे न झाल्यास पुढील २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मध्यवर्ती म. ए. समितीने दिला आहे.

खानापूर रोडवरील मराठा मंदिर येथे शनिवारी झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सीमाभागातील नामफलकांवर मराठी भाषेला डावलून केवळ कन्नड भाषेची सक्ती केली जात असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या सुनावणीच्या मुद्द्यावरही सविस्तर चर्चा झाली.

बैठकीत प्रथम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन १५ दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत मराठी भाषेची अंमलबजावणी न झाल्यास २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाची सुनावणी लवकर सुरू व्हावी यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्याचेही ठरविण्यात आले. यासाठी उच्चाधिकार समिती व वकिलांची बैठक बोलावून आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येणार आहे. तसेच २९ जून रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन छेडण्याचाही इशाराही या बैठकीत घेण्यात आला.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी सांगितले की, ३ जून रोजी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. या निवेदनाद्वारे सीमाभागातील सर्व नामफलकांवर कन्नडसोबत मराठी भाषेचा समावेश अनिवार्य करण्याची मागणी केली जाणार आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेत अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालावर चर्चा करून सीमाभागात मराठी, कन्नड आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये शासनाची परिपत्रके जारी करण्याबाबत कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणीही महाराष्ट्र सरकारमार्फत करण्यात येणार असल्याचे मरगाळे यांनी स्पष्ट केले.

बैठकीला कार्याध्यक्ष मनोहर किनेकर, रणजीत चव्हाण पाटील, रामचंद्र मोदगेकर, ऍडव्होकेट एम. जी. पाटील, शिवाजी खांडेकर, रावजी पाटील, मल्लाप्पा गुरव, लक्ष्मण पाटील, बाळासाहेब फगरे, राजाराम देसाई, रणजित पाटील, आबासाहेब दळवी, गोपाळराव पाटील, मोनाप्पा पाटील, आर. एम. चौगुले, लक्ष्मण होणगेकर, गोपाळराव देसाई, विकास कलघटगी, अनिल पाटील, मोनाप्पा संताजी, आर के पाटील, निरंजन सरदेसाई, महादेव बिरजे, रमेश धबाले आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पेरणी हंगामात खत-बियाण्यांच्या तुटवड्यावर शेतकरी आक्रमक; काळाबाजार रोखण्याची मागणी

Spread the love  बेळगाव : पेरणीच्या तोंडावर बी-बियाणे आणि खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *