चिक्कोडी : जत्रेचा प्रसाद खाल्ल्याने 50 हून अधिक जण आजारी पडल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील केरूर गावात घडली.
केरूर गावातील जत्रेला अनेक भाविक आले होते. जत्रेत प्रसाद सेवन केलेल्या 50 हून अधिक जणांना उलटी जुलाब सुरू झाला. त्यातील 30 जणांना चिक्कोडीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 10 जणांना केरूरच्या अंगणवाडी केंद्रात उपचार करण्यात आले तर आणखीन 10 जणांना एकसंबा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ वैद्यकीय पथक केरूर गावात दाखल झाले. केरूर गावात 29 मे रोजी बाळूमामा यात्रा साजरी करण्यात आली. यादरम्यान हजारो लोकांनी प्रसादाचा लाभ घेतला होता. संध्याकाळच्या जेवणानंतर काही जणांना उलट्या जुलाब सुरू झाले. 200 हून अधिक लोकांनी दुपारचे शिल्लक अन्न खाल्ल्याने त्यातील काहीजण अजूनही आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गावात वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे.