मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधून बाहेर पडायचे असून त्यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला कमी जागा आल्या. राज्यातील पराभवाची जबाबादारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीमाना देण्याची तयारी दर्शवली आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षातील नेत्यांनी वरपासून ते खाली तळापर्यंत मेहनत घेतली. मात्र राज्यात भाजपला कमी जागा आल्यात. परंतु जनतेने आम्हाला नाकारलं नसल्याचं देवेंद्र फडणीस पत्रकार परिषदेत म्हणाले. राज्यातील लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व आपण करत होतो, त्यामुळे राज्यात आलेल्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे फडणवीस म्हणाले.
यामुळे आपण भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे विनंती करतो की, मला विधानसभेसाठी पूर्णवेळ काम करायचे आहे. त्यामुळे मला सरकारमधील जबाबदारीमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्णवेळ काम करण्याची जबाबदारी द्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली. सरकारमधून मोकळं झाल्यामुळे ज्या काही कमतरता राहिल्या आहेत, उणिवा आहेत, त्यावर काम करता येईल, असंही फडणवीस म्हणाले.