नागरिकांचे निवेदन; पालकमंत्र्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : जत्राटवेस लखनापूर केसरकर मळा मार्गावरील ओढ्याचा पुल, रस्त्यासह मार्गी लावा, यासह शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा. यासाठी पर्यायी तलाव निर्मिती व शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहरलाल तलावातील गाळ उपसा करावे. गाळ काढताना संरक्षण भिंतीला तडा जाऊ नये. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली. सोमवारी (ता.१७) पालकमंत्री जारकीहोळी हे निपाणी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे सहकारत्न उत्तम पाटील यांच्या उपस्थितीत माजी आमदार प्रा. सुभाष जोशी व नगरसेविका अनिता पठाडे, दिलीप पठाडे यांच्यासह नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी सुभाष जोशी यांनी शहराला अनेक महिन्यापासून पाणी समस्या भडसावत आहे. याकडे पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. वेदगंगा दुथडी भरून वाहत असून जवाहरलाल तलावात मुबलक पाणीसाठा आहे. तरीही शहराला दहा दिवसातून एकदा तोही अपुरा पाणी पुरवठा होत आहे. यामध्ये जैन इरिगेशन कंपनीचे दुर्लक्ष झाले असून त्याला पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. आठवडाभरात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांसमवेत आंदोलन केले जाईल. याबाबत नगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले असल्याचे सांगितले. माजी नगरसेवक दिलीप पठाडे म्हणाले, जत्राटवेस-लखनापूर मार्गावरील ओढ्यावर पाणी येत असल्याने शेतकऱ्यासह नागरिकांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात नेहमी नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ही बाब गंभीर बनली आहे. या मार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली असून पुलाचे कामही अर्धवट झाले आहे. संरक्षक कठडे नाहीत. त्यामुळे समस्येत भर पडली आहे.
यावेळी पालकमंत्री जारकीहोळी यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना तातडीने सर्वे करून अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
यावेळी नगरसेवक रवींद्र शिंदे यांच्या कुटुंबीयांच्यावतीने जारकीहोळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक, माजी नगरसेवक यांच्यासह मतदारसंघातील विविध गावातील नागरिकांतर्फे अनेक समस्या व मागण्यांचे निवेदन जारकीहोळी यांना देण्यात आले. यावेळी माजी मंत्री विरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, दलित क्रांतीसेनेचे अशोककुमार असोदे, प्रा.बाळासाहेब सूर्यवंशी, अनिल संकपाळ, दिलीप पठाडे, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे, महांतेश पाटील, दिपक सावंत यांच्यासह मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी व मतदार उपस्थित होते.