अध्यक्ष निकु पाटील यांची माहिती; शासकीय विश्रामधामात बैठक
निपाणी (वार्ता) : ‘टाऊन प्लॅनिंग’ अध्यक्ष पदाची १५ मार्चला घोषणा झाली होती. पण लोकसभा निवडणुकीतील आचारसंहितेमुळे बैठक झाली नाही. शुक्रवारी (ता.२१) बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आली. सध्याचे कार्यालय भाड्याचे इमारतीपासून लवकरच स्वतःची सुसज्ज इमारत बांधण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची माहिती टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांनी दिली. येथील शासकीय विश्राम धामात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
निकु पाटील म्हणाले, अक्कोळ रोडवरील नवीन न्यायालय इमारती जवळ नगरपालिकेची ४ गुंठे जागा आहे. तेथे प्रशस्त इमारत बांधण्यात येणार आहे. जागा आणि बांधकाम निधीसाठी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. सध्याचे कार्यालय अडचणीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे दुसऱ्या जागेत तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी नव्याने कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न होणार आहेत. हद्दवाढी बाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी,सन २००३ साली हद्दवाढीचा प्रस्ताव दिला आहे. पण आजतागायत ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आपल्याकडे वर्ग केलेले नाहीत. याबाबत त्यापूर्वी तालुका पंचायतीला तीन वेळा पत्रे दिल्याचे सांगितले.
यावेळी तहसीलदार एम. एन. बळीगार, टाऊन प्लॅनिंगच्या सेक्रेटरी विजयालक्ष्मी शिंदे, संजय कांबळे, रेवन्ना सरवगोळ, हाजी मुल्ला प्रशांत हंडोरी, प्रदीप सातवेकर, सागर पाटील यांच्यासह टाऊन प्लॅनिंग मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.