खानापूर : माणसे मेली तरी चालतील पण कोंबड्या जगल्या पाहिजेत अशी काहीशी भूमिका खानापूर तालुक्यातील अधिकारी वर्ग कौलापूरवाडा पोल्ट्री फार्म प्रकरणी वागत असल्याचे दिसून येत आहे.
खानापूर तालुक्यातील कौलापूरवाडा येथे क्वालिटी कंपनीचे पोल्ट्री फार्म आहे. नियमाप्रमाणे कोणतेही पोल्ट्री फार्म गाव वस्तीपासून 200 मीटर दूर अंतरावर असणे बंधनकारक आहे. परंतु कौलापूरवाडा येथील क्वालिटीचे पोल्ट्री फार्म 200 मीटर अंतराच्या आत आहे या विरोधात गावकऱ्यांनी वारंवार पोल्ट्री मालकांना सूचना करून देखील पोल्ट्री मालक आणि प्रशासनाने गावकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात आज खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे कौलापूरवाडा येथे जाऊन पत्रकार परिषद घेऊन तसेच ग्रामस्थांसोबत चर्चा करून सदर पोल्ट्री फार्म तीन दिवसाच्या आत येथून हलविण्यासाठी प्रशासनाला वेळ देण्यात आला आहे तसेच पोल्ट्री फार्म मालकाने आणि तालुका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये जनमतांचा मान ठेवावा. प्रशासनाला हाताशी धरून मनमानी कारभार करू नये अन्यथा याप्रकरणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खानापूर ब्लॉक काँग्रेस व ग्रामस्थांतर्फे देण्यात आला आहे.
सदर पोल्ट्री फार्म संदर्भात बैलूर ग्रामपंचायतीने देखील या पोल्ट्री फार्म विरोधात ठराव मंजूर केला आहे त्याचप्रमाणे कालच खानापूर तहसीलदारांनी देखील हे पोल्ट्री फार्म बंद किंवा तात्पुरते स्थगित करण्यासंदर्भात आदेश काढले आहेत असे असताना तालुका प्रशासन कारवाई करण्यास दिरंगाई का करीत आहे, असा प्रश्न खानापूर ब्लॉक काँग्रेसने यावेळी उपस्थित केला. जो पोल्ट्री फार्म बेकायदेशीररित्या चालविण्यात येत आहे तो बंद करण्यासाठी प्रशासन वेळ का काढत आहे. पंधरा वर्षापासून क्वालिटी कंपनीने कौलापूरवाड्याच्या जनतेला भूलथापा दिल्या आहेत. या पोल्ट्री फार्ममुळे कौलापूरवाडा परिसरातील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे असे असताना तालुका प्रशासन कोणतीही कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे. तालुका प्रशासनाने कौलापूरवाडा येथील पोल्ट्री फार्म येत्या तीन दिवसात स्थलांतरित केले नाही तर कौलापूरवाडावासीय तसेच खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.