निपाणी (वार्ता) : निपाणीहून सुळगावला जाण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता बस आहे. पण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घरी पोहचण्यास रात्री उशिरा होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी
वरील वेळेऐवजी सायंकाळी ५:१० वाजता बस सोडून सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते आगार प्रमुख संगाप्पा यांना देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, निपाणी सुळगाव ही बस सायंकाळी सहा वाजता सुटून मत्तीवडे, सुळगाव, व्हाया करनूर, वंदूर कोगनोळी मार्गे निपाणीला परत येते. वरील मार्गावरून बस थांबत जात असल्यामुळे रात्री उशिरा या विद्यार्थ्यांना घरी पोहोचावे लागते. परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यापूर्वीही याबाबत निवेदन देण्यासह प्रत्यक्ष भेटून वेळेच्या बदलाची मागणी केली होती. पण कोणतेच कार्यवाही न झाल्याने पुन्हा निवेदन देण्यात येत आहे. वेळेत बदल न झाल्यास रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा राजू पोवार त्यांच्यासह विद्यार्थी व पालकांनी दिला आहे. याशिवाय आप्पाचीवाडी ग्राम पंचायततर्फेही निवेदन देण्यात आले.