मांगुर फाट्यावरून वाहतूक बंद; पोलिसासह महसूल विभाग घटनास्थळी
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात चार दिवसापासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी (ता.२६) सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने मांगुर फाट्यावर सेवा रस्त्यासह शेतीवाडीतील पाणी आल्याने दुचाकी स्वारांची तारांबळ उडाली. शिवाय महामार्गावरील वाहतूक मंद गतीने सुरू होती. पावसाचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी पोलीस प्रशासनासह महसूल विभागाचे अधिकारी पाण्यावर लक्ष ठेवून आहेत.
गुरुवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे मांगुर फाटा परिसरात शेतीवाडीतून पाण्याचे लोंढे वाहत आहेत. त्यामुळे सतर्कता बाळगून पूर भागातील अधिकारी कर्मचारी थांबून आहेत. सौंदलगा हद्दीत मांगुर फाट्याजवळ कुंभार शेताजवळ महामार्गाला पर्याय म्हणून सुरू ठेवलेल्या सेवा रस्त्यावर वेदगंगेच्या नदीपात्रातील बॅक वॉटरचे पाणी आलेले नाही. कोकण फाटा आणि या परिसरात पाऊस वाढल्यास कोल्हापूरहून बेळगावकडे होणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सकाळच्या सत्रात प्रशासनाने काही काळ दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी केली होती. मांगुर फाट्यावरील पाण्याचा वेदगंगा नदीत निचरा केल्याने रस्त्यावरील पाणी कमी झाले. निपाणी आगारातील बस मांगुर फाटा मार्गे कुन्नूर पर्यंत सोडल्या जात होत्या. पण सायंकाळी ही वाहतूक बंद केली. पावसाचा जोर असाच राहिल्यास वेदगंगेच्या पाणी पातळीत वाढ होऊन बॅकवॉटरचे पाणी सेवा रस्त्यासह शेतीवाडी जाणार आहे. यावेळी मात्र प्रशासनाला एकेरी वाहतूक सुरू करावी लागणार आहे.
सहा पदरीकरण कामावेळी भुयारी पुलाचे बांधकाम अर्धवट झाले असून पिलर टाकून पुलाचे बांधकाम झालेले नाही. केवळ भिंत उभा करून मुरमाचा भराव टाकल्याने ही समस्या उद्भवली आहे.
——————————————————————–
मांगुर फाट्यावर अधिकाऱ्यांसह कर्मचारी
मांगुर फाटा येथे तहसीलदार एम. एन. बळीगार, पोलीस उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्यासह रस्ते देखभाल कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे यांच्यासह कर्मचारी या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत.