निपाणी : तालुका महाराष्ट्र एकीकरण व युवा समिती निपाणी यांच्या वतीने निपाणीतील ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कुर्ली व सौंदलगा येथे उच्च प्राथमिक मराठी शाळांमध्ये वाटप केले.
मराठी शाळा व भाषा वाचविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी जोर द्यावा. जेणेकरून आपली भाषा आपणच वाढवून तिचे जतन संवर्धन व संरक्षण ही प्राथमिक जबाबदारी खांद्यावर घेऊन सीमाभागातील मराठी शाळा वाढविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका व युवा समिती कायम स्वरुपी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पाठीशी राहील तसेच शिवाजी विद्यापीठ सर्व बाबतीत प्रवेश घेण्यासाठी सीमाभागातील विद्यार्थ्यांना पालकाची भूमिका दाखवत आहे. यासाठी ज्यांना विद्यापीठमध्ये कोणत्याही स्तरामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी व युवा समिती आपल्याला सहकार्य करेल. जे सर्व सामान्य शेतकरी वर्गातील मुले- मुली असतील आणि ज्यांना शिक्षणातून आपले व समाजाचे हित करायचे असेल तर सरकारी नोकरीमध्ये महाराष्ट्र शासन सीमाभागातील 865 गावातील तरुणांनी मराठी भाग व महाराष्ट्रीयन म्हणून स्वीकारते याचा लाभ घेवून होतील तेवढ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका सदैव आपल्या पाठीशी सह्याद्री पर्वताच्या कड्यासारखा उभा राहील, असे मत मार्गदर्शन करताना समिती अध्यक्ष श्री. अजित पाटील म्हणाले.
यावेळी मार्गदर्शक के. डी. पाटील यांनी आपले अनमोल विचार लहान बाळ गोपाळ यांना केले. अमोल पाटील, किरण मगदूम, कार्याध्यक्ष युवा समिती संतोष नीढोरे, उपाध्यक्ष गणेश माळी शिवाजी पाटील, आदित्य पाटील, आलोक व्हाराते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.