निपाणी (वार्ता) : येथील रहिवासी अर्जुनी शाळेचे शिक्षक, पर्यावरणप्रेमी नामदेव चौगुले यांनी वडील वारकरी विठोबा लक्ष्मण चौगुले यांचे स्मरणार्थ १२५ रोपांची अनोखी भेट देऊन नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापुर्वी नामदेव चौगुले यांनी निपाणी शहर व परिसरात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून रोपांचे संगोपन करीत आहेत. त्यांनी दिलेली १२५ रोपे हमिदवाडा येथील चौंडेश्वरी देवराई मध्ये लावण्यात आली. याशिवाय गोवा येथील प्रशांत केशव नाईक यांनी जन्म दिवसानिमित्त दहा हजार रुपयांची रोपे देवराईस भेट दिली. नामदेव चौगुले यांनी, मानवाच्या चुकीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. तो थांबवण्यासाठी प्लास्टिक वापरणे बंद करणे आवश्यक आहे. याशिवाय प्रत्येकाने एक रोप लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले.
यावेळी सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे प्रा. डॉ. अशोक डोनर, प्रा.शिवाजी मोरे, संस्थापक फिरोज चाऊस, नामदेव चौगुले, हमिदवाडा ग्रामपंचायत अध्यक्ष कृष्णात बुरटे, उपाध्यक्ष उमेश डावरे, सदस्य, संदीप ठाणेकर, डॉ. खरबुडे, पांडुरंग गोरे, रणजित गोरे यांच्यासह न्यू इंग्लिश स्कूल, प्राथमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.