खानापूर : भीमगड अभयारण्यात असलेल्या 9 गावांचे स्थलांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या संदर्भात नऊ गावातील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी व या विषयावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय बैठक राजा श्री शिवछत्रपती शिवस्मारक येथे बोलाविली होती.
बैठकीत विचार विनिमय होऊन, सर्वपक्षीय कमिटी करण्याचा निर्णय घेण्यात आला व सदर बैठकीत तीन ठराव मंजूर करण्यात आले. 1) स्थलांतरित करण्यात येणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकास पंधरा लाख रुपये देण्यात यावेत. 2) शेती जमीन जाणाऱ्या कुटुंबास, जमिनीच्या बदल्यात जमीन, किंवा योग्य तो मोबदला देण्यात यावा. 3) स्थलांतरित करण्यात येणाऱ्या ग्रामस्थांना, त्यांच्या ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या ठिकाणीच जागा देऊन, त्या ठिकाणी घरकुल बांधून देण्यात यावेत. असे तीन ठराव मंजूर करण्यात आले. तसेच या तीन ठरावाबाबत, सरकारकडे पाठपुरावा करून प्रयत्न करण्यासाठी, सर्वपक्षीय कमिटी स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. सदर कमिटीमध्ये तालुक्यातील माजी आमदार, विविध राजकीय पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा पंचायत सदस्य, तसेच विस्थापित होणाऱ्या, प्रत्येक गावातील काही नागरिकांचा यात समावेश करण्याचे ठरविण्यात आले.
सुरुवातीला खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी सर्वपक्षीय नेते मंडळींचे स्वागत केले व बैठक बोलविण्याचा उद्देश स्पष्ट केला.
सदर बैठकीत अनेक नेते मंडळींनी व ग्रामस्थांनी 9 गावं स्थलांतरित करण्याबाबत, आपले मनोगत व्यक्त केले. काही ग्रामस्थांनी आम्हाला खानापूर तालुक्यातच स्थलांतरित करून घर बांधून देण्यात यावेत व सर्व सोयी सुविधा पुरवाव्यात, तसेच शेतजमिनीच्या बदल्यात शेतजमीन देण्यात यावीत किंवा योग्य तो मोबदला दिल्यास स्थलांतर करण्याची तयारी दर्शविली. तर काही ग्रामस्थांनी आपल्याला योग्य रस्ता व रस्त्यावरील पूल बांधून, योग्य त्या सोयी सुविधा पुरविल्यास गावातच राहण्याची तयारी दर्शविली व स्थलांतरास विरोध केला.
बैठकीत माजी आमदार दिगंबर पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई, बाळासाहेब शेलार, यशवंत बीर्जे, काँग्रेसचे नेते ॲड. ईश्वर घाडी, ॲड. अरुण सरदेसाई, समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, जेडीएस अध्यक्ष यल्लाप्पा कातगार, शिरोली ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य कृष्णा गुरव, निरंजन सरदेसाई, नारायण काटगाळकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक गवाळकर, विजय गावडे व आदी जणांची भाषणे झाली.
बैठकीला जेडीएसचे नेते नाशीर बागवान, माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बेळगावकर, पुंडलिक कारलगेकर, काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, जोतिबा रेमाणी, लक्ष्मण बामणे, माजी सभापती सुरेश देसाई, मारुतीराव परमेकर, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष भैरू पाटील, वीशाल पाटील, मधु कवळेकर, समितीचे नेते सूर्याजी पाटील, पंडित ओगले, पांडुरंग सावंत, नारायण कापोलकर, भाजपाचे सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, पिकेपीएस संचालक शंकर पाटील, भरमानी पाटील, राजू सिध्दानी, भाजपाचे मोहन पाटील, तसेच नेते मंडळी व भीमगड अभयारण्यातील नागरिक उपस्थित होते.