विविध हिंदू संघटनांची मागणी; तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात पर्यावरणाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येत आहे. तरीदेखील अनेक विषयांमध्ये प्रशासनाकडून अपेक्षित कृती होत नाही. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘मूर्तीदान’ आणि ‘कृत्रित तलाव’ यांसारख्या मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यामुळे एक प्रकारची मूर्तीची विटंबना होत आहे. प्रशासनाने अशा मोहिमा बंद करून मूर्तींची विटंबना थांबवावी अशी मागणी विविध हिंदू संघटनातर्फे करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन तहसीलदार प्रवीण कारंडे यांना देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, कृत्रिम तलावातील घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. कृत्रिम हौदात विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती पुन्हा नदी, समुद्र, तलाव आदी ठिकाणी टाकल्या जातात. यातून कृत्रिम हौदासाठी केलेला खर्चही वाया जात आहे. गणेशभक्तांकडून विश्वासाने घेतलेल्या गणेशमूर्तीचे धार्मिक पावित्र्य जपून विसर्जन होणे अपेक्षित आहे. मात्र तसे न करता बुलडोझरने मूर्ती चिरडणे, ही गणेशाची विटंबना आहे.
नगरपालिकेने मूर्तिदान प्रकल्प राबवून जमा झालेल्या गणेशाच्या मूर्ती कचऱ्याच्या गाडीतून नेऊन कचरा डेपोमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. यापुढे अशा घटना घडणार नाही त्याकडे नगरपालिका व महसूल विभागाने लक्ष देण्याची मागणी निवेदनात करण्यात आले आहेत.
तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. यावेळी रवींद्र शिंदे, बबन निर्मले, निवास पोवार, दिलीप काळभरे, अनिल बुडके, अभिनंदन भोसले, अमोल चेंडके, प्रशांत घोडके, अक्षय वाघेला, अजित पारळे, राजेश आवटे, विनायक गिरी, शैलेश बलुगडे, अथर्व खतकर यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.