इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड क्रिकेट संघासाठी हा मोठा धक्का आहे. इंग्लंड क्रिकेट संघात मोईन अलीचे योगदान खूप महत्त्वाचे होते. त्याने इंग्लंडला दोन विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले. ज्यामध्ये एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषकाचा समावेश आहे.
३७ वर्षीय मोईनने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यानंतर त्याने खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला की, मी इंग्लंडसाठी भरपूर क्रिकेट खेळलो आहे आणि आता नव्या पिढीसाठी मार्ग मोकळा करण्याची वेळ आली आहे. मोईन अली हा एक उत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडू होता, जो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज असायचा. त्याने एकदा भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात ५ विकेट्स घेत एकट्याने इंग्लंडला विजय मिळवून दिला होता.
मोईन अलीची चमकदार कारकीर्द
मोईन अलीने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ६८ कसोटी, १३८ एकदिवसीय आणि ९२ टी-२० सामने खेळले. त्याने इंग्लंडसाठी ८ शतके आणि २८ अर्धशतकांसह एकूण ६६७८ धावा केल्या आणि ३६६ विकेट्सही घेतल्या.