याही वर्षी नवरात्रीत ‘शाही दसरा महोत्सवातून’ विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर : या वर्षीचा नवरात्रोत्सव दि. 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगाने गुरूवारी सायंकाळी नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाविकांसाठी नवरात्रोत्सवात चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश संबंधित सर्व विभागांना दिले. ते म्हणाले, भाविकांना चांगल्या पध्दतीने दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करा, स्वच्छता विषयक कामांना सुरुवात करा, सालाबादप्रमाणे ठिकठिकाणी वाहनतळ उभारुन दिशादर्शक फलक लावा, पोलीस प्रशासन आणि मंदिर समिती यांनी समन्वयातून सुरक्षाविषयक नियोजन करा, गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना राबवा तसेच भाविकांना चांगल्या प्रकारे आरोग्य विषयक सुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
बैठकीला अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, प्रांताधिकारी हरिष धार्मिक, अति. महापालिका आयुक्त राहुल रोकडे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, पोलीस उपअधिक्षक अजित टिके, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, तहसिलदार स्वप्निल रावडे, जिल्हा पर्यटन समिती सदस्य आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी मंदिर परिसरातील धोकादायक इमारतींचीही पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. आरोग्य पथकाबरोबर आपत्ती विषयक नियोजन करा. बचाव पथकांची नेमणूक करा. दरवेळी सारख्या प्रत्येक विभागाने आपल्याकडील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या सूचना त्यांनी उपस्थितांना दिल्या.
नऊ दिवस होणार विविध कार्यक्रमांचे आयोजन
जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी नवरात्र उत्सवात शाही दसरा महोत्सवांतर्गत विविध पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच मागील वर्षी पासून करवीर तारा पुरस्कारही सुरु करण्यात आला आहे. या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. याही वर्षी महिलांचा जास्त सहभाग असणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. दसऱ्या दिवशीच्या मुख्य कार्यक्रमावेळी विविध मिरवणुकांध्ये ढोल, लेझीम, पारंपरिक नृत्य, कला तसेच जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेल्या क्रीडापटूंचा सहभाग मिरवणुकीत असणार आहे. तसेच नवरात्रीत प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम यात पारंपरिक पोशाख दिवस, शालेय स्तरावर स्पर्धांचे आयोजन, करवीर तारा पुरस्कार वितरण, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पारंपरिक युध्द कला, ई. कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.