मुंबईमध्ये मुंबईकर ग्रामस्थांचा विक्रमी उपस्थितीत स्नेहमेळावा
मुंबई : एका बाजूला संपूर्ण आयुष्य जनतेसाठी खर्ची घालणारा मी आणि दुसऱ्या बाजूला राजकीय हव्यासापोटी विरोधकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगात घालण्याची स्वप्ने बघणारी दुष्ट प्रवृत्ती, अशी ही लढाई आहे. या सगळ्याचा विचार आणि तुलना तुम्हीच करा आणि अशा दुष्ट प्रवृत्तीला हद्दपार करा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ केले.
मुंबईमध्ये मुंबईकर ग्रामस्थांच्या आयोजित स्नेह मेळाव्यात मंत्री बोलत होते. प्रमुख उपस्थित व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व दीप प्रज्वलनाने मेळाव्याची सुरुवात झाली. मुंबईकर ग्रामस्थांच्यावतीने पांडुरंग शेट्टी, अरुण पाटील, अमृत साळोखे, दत्तात्रय जाधव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गेली ३५-४० वर्षे सतत पहाटे पाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत निरंतर अव्याहत माझी जनसेवा सुरू असते. संपूर्ण आयुष्यात कधीच गट- तट, जात -धर्म पाहिला नाही. दुसऱ्या बाजूला राजकीय स्वार्थापोटी विरोधकांना तुरुंगात घालणारी षडयंत्री प्रवृत्ती. तसेच; निराधारांच्या योजनेची चौकशी लावून गोरगरिबांच्या संसारात पाणी ओतणारी दुष्ट वृत्ती. बांधकाम कामगारांच्या नोंदण्या बंद करणारा, एमआयडीसीतील कंपन्या बंद पडणारा, दूध संघ विकून मोडून टाकणारा, मागासवर्गीयांच्या जमिनी काढून घेणारा, अशा दृष्ट प्रवृत्तीशी ही लढाई आहे.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी एका ऐतिहासिक वळणावर विधानसभा निवडणुकीत मला दिलेल्या पाठिंबामुळे आमचे पाठबळ वाढलेले आहे. तसेच; प्रा. संजय मंडलिक यांनीही लोकसभेतील पराजयाने खचून जाऊ नये. आठवड्यापूर्वीच बिद्रीमध्ये झालेल्या जाहीर सभेत मी त्यांना सांगितले आहे की, ते निश्चितच पुन्हा खासदार होतील.
शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले, येत्या विधानसभा निवडणूक. कारण; त्यांच्या ३५-४० वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीत प्रत्येक सामान्य माणसापर्यंत त्यांचे काम पोहोचले आहे. काम करणाऱ्या माणसाची निंदानालस्ती होत असते. परंतु; काम करणारा कधीच थांबत नसतो.
भाषणात गोकुळ दूध संघाचे संचालक अमरीशसिंह घाटगे म्हणाले, हसनसाहेब मुश्रीफ आणि विरोधक, अशी तुलना करताना समजून येईल की कोण सरस आहे आणि कोण निरस आहे. आजवर संजयबाबा घाटगे आणि मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांच्यामध्ये सहा लढती झाल्या. परंतु; मुश्रीफसाहेब यांनी कधीही आमची वैयक्तिक नेमदार आलती केली नाही आणि त्रासही दिला नाही परंतु दुर्दैवाने आज कागल तालुका त्या दिशेने चालला आहे.
गुरुनिष्ठा तुम्ही शिकवणार……?
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गेली ३०-३५ वर्ष शरद पवारसाहेब यांच्या सोबत त्यांच्या सुखदुःखात राहिलो. ज्यावेळी निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळी त्यांना सांगून आलो आणि त्यांनी समजावूनही घेतले. विरोधक मात्र सत्तेच्या चार वर्षांच्या काळात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या सहवासात गेले. त्यांच्याकडून बदल्या करून घेतल्या. सत्तेच्या गेल्या एक वर्षाच्या काळातसुद्धा श्री. फडणवीस यांनी त्यांचा सर्व बालहट्ट पुरविला. असे असताना गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये युतीच्या विरोधात अपक्ष उभारून त्यांनी गुरूलाच दगा दिला आणि आत्ता सुद्धा गुरूला शक्ती देऊन गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली असता गुरुच्या पाठीत खंजीर खुपसला. ही कसली गुरूनिष्ठा? असा सवाल करताना एवढी उठाठेव करून गुरूनिष्ठा तुम्ही आम्हाला शिकवणार काय?
हार -फुलांचा ढीग…..
या मेळाव्यात श्री. हसन मुश्रीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईकर ग्रामस्थांनी वैयक्तिक सत्कार आणि ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने सत्कार यांच्या माध्यमातून प्रचंड गर्दी केली होती. मेळाव्याच्या ठिकाणी अक्षरशः फुले, पुष्पहार आणि पुष्पगुच्छ यांचा ढिग लागला होता. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मुंबईकर ग्रामस्थांची श्री. मुश्रीफ यांचा सत्कार करण्यासाठी अक्षरशः रीघ लागली होती. पाच हजाराहून अधिक मुंबईकर ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे श्री. मुश्रीफही भारावले.
व्यासपीठावर शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विठ्ठलराव भोसले, वसंतराव धुरे, सतीश पाटील, शशिकांत खोत, बाळासाहेब तुरंबे, दत्ता पाटील, कृष्णात मेटील, सूर्यकांत पाटील, सौ. शितल फराकटे, काशिनाथ तेली, डी. एम. चौगुले, अंकुश पाटील, शिरीष देसाई, दीपक देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.