बेळगांव : प्रवाशांना लुटून सोने पळविणाऱ्या आरोपींना अटक करण्यात मार्केट पोलिसांना यश आले आहे. मार्केट पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार रिजवान सिराज पठाण (वय ४०, विद्यानगर, एपीएमसी, बेळगाव), मलिकजान दस्तगीरसाब शेख (वय २६, मूळचा गोकाक सध्या राहणार एपीएमसी) आणि विनायक अरुण हिंडलगेकर (वय ३२, सध्या राहणार जुने गांधीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ७ लाख रुपये किमतीचे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने यासह मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायबाग तालुका हरुगिरी येथील मीनाक्षी गोपाळ कुषपन्नावर यांचे ३० डिसेंबर २०२२ रोजी बेळगाव येथील मध्यवर्ती बस स्थानकातून १०० ग्राम सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली होती. मीनाक्षी यांनी मार्केट पोलीस ठाण्यात याची तक्रार नोंदविली होती तब्बल दोन वर्षानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून यामध्ये तिघांना अटक केली आहे. या तिघांकडून वीस ग्राम सोन्याची चेन ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ४० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असे मिळून दहा तोळे सोने जप्त केले आहे. पोलीस आयुक्त याडा मार्टीन, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महांतेश धामन्नावर, उपनिरीक्षक केरूळ व सहाय्यक पोलिसांनी ही कारवाई केली.