बेळगाव : येथील शब्दगंध कवी मंडळातर्फे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी रविवारी बैठक पार पडली. शब्दगंधचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी यांनी अभिनंदनाचा ठराव मांडताना अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठीचे संवर्धन आणि संशोधन करण्यासाठी मदत होणार असल्याचे म्हटले. त्यामुळे महाराष्ट्र शासन, साहित्यिक, संशोधक आणि मराठी संस्थांचे अभिनंदन करण्यात आले. यासह जेष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची दिल्ली येथे होणाऱ्या 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शब्दगंध कवी मंडळाचा 34 वा वर्धापन दिन कार्यक्रम दि. 18 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्याचे ठरले असून मंडळ नोंदणीकृत करण्याच्या प्रक्रियेला गती आणण्याविषयी चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थित कवींच्या काव्य वाचनाने मैफिलीला रंगत आली. सुधाकर गावडे यांनी ‘अपेक्षा’, व्ही एस वाळवेकर यांनी ‘प्रेम’, परशराम खेमणे यांनी ‘हे ही खरे आहे’, रेखा गद्रे यांनी ‘हितगुज’, प्रा स्वरूपा इनामदार यांनी ‘मुलगी असती तर’, शीतल पाटील यांनी ‘पापणी आडचं पाणी’, अंकिता कदम यांनी ‘बिमारी’, जितेंद्र रेडेकर यांनी ‘हसतेस किती छान’, बसवंत शहपूरकर यांनी ‘अडाणी मेळावा’ आदी विविध विषयावरच्या कवितांचे वाचन झाले.
बैठकीला अश्विनी ओगले, चंद्रशेखर गायकवाड, सागर मरगानाचे यांच्यासह शब्दगंधचे कवी उपस्थित होते. आभार मंडळाचे सचिव सुधाकर गावडे यांनी मानले.