खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे केंद्र सरकारचा निषेध म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात येते. येणारा काळा दिन खानापूर तालुक्यात गांभीर्याने पाळण्यात यावा यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. बुधावर दि. 30 ऑक्टोबर रोजी नंदगड येथे समिती नेते आणि कार्यकर्त्यांकडून काळ्या दिनासंदर्भात जनजागृती करण्यात आली आणि 1 नोव्हेंबर हा काळा दिन गंभीर्याने पाळा तसेच शिवस्मारक येथे केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी लाक्षणिक उपोषणास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सीमास्त्याग्रही पुंडलिक चव्हाण, समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, राजाराम देसाई, मोहन गुरव, रुक्माना झुंजवाडकर, विठ्ठल गुरव, विनायक चव्हाण, नागेश पाटील, ब्रम्हानंद पाटील, प्रवीण पाटील, प्रकाश गिरी यांच्यासह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.