कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोंबर २०२४ पासून लागू झालेली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी ता.करवीर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता – २०२३ चे कलम १७९ अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महाडिक यांना देण्यात आली होती. याबाबत धनंजय महाडिक यांनी खुलासा सादर केला. याबाबत सादर केलेला खुलासा अमान्य करीत धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी भरारी पथकातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यानुसार भारतीय न्याय संहिता बी एन एन एस २०२३ अंतर्गत १७१ (२) (a) अंतर्गत दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.२३ वा जुना राजवाडा कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.