संकेश्वर : येथील बस स्थानकात बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या पिशवीतील अडीच तोळ्याचे सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार दि. ८ रोजी दुपारी ४ वाजता घडली. यामुळे बस स्थानकातील दुबळ्या सुरक्षा यंत्रणेमुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी सौ. अंजना शिवानंद जळके रा. बसवान गडे (ता. चिकोडी) या संकेश्वर येथे येऊन बाजार घेऊन माहेरला (केस्ती ता. हुकेरी) जाण्यास संकेश्वर – केस्ती सिटी बसमध्ये चढत होत्या. अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत पिशवीत ठेवलेले गंठण, सोन्याची कर्णफुले, साखळी ठेवली होती. त्या सोन्याच्या ऐवजावर चोरट्याने डल्ला मारला. मात्र काही वेळानंतर जळके यांना पिशवी उघडी दिसल्याने चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत सौ. अंजना जळके यांनी पोलिसात फिर्याद दिल्याने संकेश्वर पोलिसात मंगळवार ता. १२ रोजी घटनेची नोंद उशिरा झाली आहे. विशेषतः कर्नाटक सीमेवर आंतरराज्य प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या संकेश्वर बस स्थानकात सीसीटीव्हीचा अभाव असून येथे चोरीच्या घटना वारंवार घडतात. मात्र प्रवाशांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने अशा घटना घडत असल्यानेे बस स्थानकाचे वाभाडे निघत आहे.