खानापूर : अतिक्रमित वन जमिनीवर अधिकार मिळवण्यासाठी खानापूर तालुका वनहक्क समितीने चालवलेल्या उपक्रमांतगर्त वनहक्क प्राप्तीसाठी जे दावे दाखल करावे लागतात त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया कांही प्रमाणात पूर्ण होऊन बहुतांश मागणीदारांनी ‘क’ नमुन्यातील आवश्यक तो अर्ज भरून तयार केला आहे. तेव्हा दावा मंजूरीसाठी पुढे काय करावे याबाबत माहिती देण्याकरिता सोमवार दि. ०९ डिसेंबर रोजी खानापुरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तालुका वनहक्क समितीच्या श्री. महादेव मरगाळे यांनी सदर बैठकीचे आयोजन केले. बैठकीला श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपतराव देसाई (आजरा) अध्यक्षस्थानी होते. यावेळी विविध ठिकाणी वनाधिकारासाठी झटणारे बयाजी येडगे (आवंडी ता. आजरा), अभिजित सरदेसाई खानापूर आदिंनी मार्गदर्शन केले.
बैठकीला उपस्थित अर्जदारांना मार्गदर्शन करताना संपतराव देसाई म्हणाले, पुढील वाटचाली करिता गावोगावच्या वन हक्क समितीतील पदाधिकाऱ्यांनी सक्रिय होणे गरजेचे आहे. कारण येथून पुढे स्थानिक वन हक्क समितीने आलेल्या अर्जांची पडताळनी करायची असते. मग पुढील कार्यवाहीसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित करावे लागते. त्याचबरोबर स्थानिक वन हक्क समितीने या सर्व कामकाजाची योग्य नोंद ठेवायची असते. यावेळी बयाजी येडगेंनी वन हक्क समितीने कोणत्या प्रकारे नोंदी ठेवाव्या लागतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अभिजित सरदेसाईनी सांगितले की, दुर्गम भागातील मराठी भाषिक मागणीदारांना कानडीतून अर्ज भरणे जमत नसल्याने दाव्यांचे अर्ज कानडी व मराठी अशा दोन्ही भाषेतून उपलब्ध करून देऊ. मागणीदारांनी स्थानिक वन हक्क समितीच्या मदतीने आपापले अर्ज भरून घ्यावेत व उर्वरित प्रक्रियेकरिता आवश्यक ती कागदपत्रे सादर करावित असे महादेव मरगाळे यांनी उपस्थितांना आवाहन केले.
सदर बैठकीला पर्यावरणप्रेमी असलेले मुळचे निडगल ता. खानापूरचे अनंत पाटील (रा. गडहिंग्लज) हे ही उपस्थित होते.
अनंत पाटील हे पक्षी मित्र व गडहिंग्लज नगर परिषदेचे ब्रँड अँबेसिडर आहेत.
बैठकीला तळावडे, कणकुंबी, मान, डोंगरगांव, गुंजी, करंजाळ, माणिकवाडी आदी गांवातील मागणीदार बहुसंख्येने उपस्थित होते.