उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील सर्वे क्रमांक १० मधील आर. के. नगर, इंदिरानगर ठिकण गल्ली येथील वसाहतींच्या उताऱ्यावर वक्फची नोंद झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे सहकार रत्न उत्तम पाटील यांनी पुढाकार घेऊन ४ डिसेंबर २०२४ रोजी निपाणीचे तहसीलदार मुझफ्फर बळीगार यांच्या उपस्थितीत बोरगाव नगरपंचायत येथे बैठक घेऊन नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. शासन दरबारी पाठपुरावा करून अखेर सातबारा वरील वक्फ नोंद रद्द करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
शहरातील सर्वे क्रमांक १० मधील १२ एकर २७ गुंठ्यात वास्तव्यास असणाऱ्या अनेक वसाहतींच्या उताऱ्यावर वक्फ बोर्ड ची नोंद होती. ही बाब लक्षात आल्यानंतर येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. ही माहिती लक्षात घेऊन सहकार रत्न उत्तम पाटील यांनी तातडीने ४ डिसेंबर २०२४ रोजी येथील नगरपंचायत कार्यालयात तहसीलदार बळीगार यांच्या उपस्थितीत नागरिकांची बैठक घेऊन याबाबत कोणीही घाबरू नये सर्वांना न्याय देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन असे आश्वासन दिले होते .त्यानंतर त्यांनी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारासह इतर अधिकाऱ्यांना भेट घेऊन शासन दरबारी प्रयत्न करून सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यामुळेत्या वसाहतीवरील उताऱ्यावर वक्फची नोंद रद्द झाली आहे. उत्तम पाटील म्हणाले, नागरिकांना न्याय देण्याचे कार्य केले पाहिजे. आपण शाश्वत विकास कामे केली तरच ती नागरिकांच्या नेहमी लक्षात राहत असतात. काही लोकांनी नोंदीबाबत अफवाही पसरवली होती .पण आपण याबाबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी त्यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही नोंद रद्द करून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मागणी केली होती. त्याप्रमाणे या कामी आपल्याला यश आले आहे. यासाठी सर्व आधिकारी, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व नागरिकांचे सहकार्य मिळाल्याचे सांगितले.
उताऱ्यावरील नोंद रद्द झाल्याने सोमवारी (ता.९) नगरसेवकांनी आर. के नगर, इंदिरानगर मध्ये नवीन उताऱ्यांचे वाटप केले. यावेळी नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, नगरसेवक अभयकुमार मगदूम, माणिक कुंभार, प्रदीप माळी, जावेद मकांदार, दिगंबर कांबळे, शोभा हावले, वर्षा मनगुत्ते, रुक्साना अफराज, गिरीजा वठारे, सुवर्णा सोबाने, तुळशीदास वसवाडे, संगीता शिंगे, अश्विनी पवार, रोहीत पाटील उपस्थित होते.