Thursday , December 12 2024
Breaking News

मंगेश चिवटे यांच्याकडील वैद्यकीय कक्षाची जबाबदारी आता रामेश्वर नाईक यांच्या हाती

Spread the love

 

 

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता मंत्रालयातील विविध विभागांमध्ये आपल्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदावरून मंगेश चिवटे यांच्याकडील सूत्रे रामेश्वर नाईक यांना सोपवण्यात आली आहेत. रामेश्वर नाईक यांनी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे फडणवीस यांनी नाईक यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सोपवली आहे. तसंच सद्यस्थितीत नाईक यांच्याकडेच उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचीही जबाबदारी आहे.
एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाल्यानंतर मंगेश चिवटे यांची मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदी निवड केली होती. चिवटे यांनीच सर्वप्रथम २०१५ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची संकल्पना मांडली होती. मंगेश चिवटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे काही महिन्यांनंतर ही संकल्पना पूर्णत्वास येऊन सदर कक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून या कक्षाद्वारे गोरगरीब रुग्णांना अर्थसाहाय्य करण्यात येते.
मंगेश चिवटे यांनी २०२२ साली या कक्षाचे प्रमुख म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या कामकाजात मोठे बदल केले. या कक्षाकडून एक नंबर जारी करत मिस कॉल्डद्वारे रुग्णांच्या मोबाईलवर या निधीसाठी लागणारा फॉर्म उपलब्ध होऊ लागला. तसंच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद वाढवण्यासाठी वेबबेस्ड पोर्टल लाँच करण्यात आले. त्यामुळे लाभार्थी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. मागील अडीच वर्षांच्या काळात या कक्षाद्वारे ५१ हजारांहून अधिक रुग्णांना ४१९ कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य करण्यात आले.
दरम्यान, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर मंगेश चिवटे यांच्याकडेच या कक्षाची जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जवळच्या अधिकाऱ्यावर विश्वास दर्शवत रामेश्वर नाईक यांची कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

ईव्हीएम विरोधात तुम्ही ठराव करा, दिल्ली अन् मुंबई आम्ही गाजवू : शरद पवार

Spread the love    मारकडवाडी : ईव्हीएमवरून देशातील जनतेची दिशाभूल करू नका, असे सांगत देवेंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *