बेळगाव : पंचमसाली समाजाला लोकशाही मार्गाने शांततेने आणि न्यायालयाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करत आंदोलन करण्याचा परवानगी देण्यात आली होती मात्र न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. कायदा सुव्यवस्था हाती घेणाऱ्यांची कदापिही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी विधानसभेत बोलताना दिला.
आज गुरुवारी सकाळी विधानसभेतील भाजपच्या आमदारांनी मंगळवारी झालेल्या पंचमसाली आंदोलनाप्रसंगी पोलिसांनी केलेल्या लाठीमारावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी विरोधी पक्ष नेते अशोक यांनी, सरकारने लिंगायत समाजाची माफी मागावी. लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली.
विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री परमेश्वर म्हणाले, या आंदोलनात ट्रॅक्टर घेऊन येण्याची परवानगी नव्हती. त्याच बरोबर नेमून दिलेल्या जागेवरच आंदोलन करणे आवश्यक होते. मात्र आंदोलकांनी न्यायालयाने घालून दिलेला आदेश धुडकावून सुवर्णसौधकडे धाव घेतली. ट्रॅक्टर चालविले, बॅरिकेट्स पाडले. पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी परिस्थिती चिघळली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केले, असेही परमेश्वर यांनी यावेळी स्पष्ट केले.